७ चीनचे अंतरंग

काँग्रेसने चीनला सहानुभूति दाखविण्यासाठी शुश्रूषापथक पाठविंले आहे.  त्यांतील एक डॉ. देवेश मुकर्जी हे आहेत.  त्यांनी एक पत्र पाठविलें आहे.  त्याचा सारांश :--

आम्ही येनान गांवच्या जवळजवळ येत होतों.  दुरून डोंगरावरचें मंदिर दिसत होतें.  त्यास पगोडा म्हणतात.  चीनमधील बहुतेक शहरांची ही मुख्य खूण आहे.  या बुध्द मंदिरांचे ऊंच कळस दुरूनच दिसत असतात.  आमचें स्वागत करण्यासाठी लोक जमले होते.  ते आमची वाट पहात होते.  विमानांतून हल्ला होईल या भीतींने जरी सर्व लोक जमले नव्हते तरी कांही हजार तेथे निर्भयपणे उभे होते.  आम्हाला पहातांच आमचे त्यांनी स्वागत केलें.  त्यांनी आम्हांस हारतुरे दिले का?  नाही  ' साम्राज्यशाही जपानचा धिक्कार असो - जपान लष्करशाही नष्ट करा.'  अशा ललका-यांनी त्यांनी आमचें स्वागत केलें.  अधिकारी, विद्यार्थी कामगार सर्वांचा एकच पोशाख होता.  त्या जमलेल्या हजार लोकांची तोंडें तेजानें फुलली होतीं.  एक प्रकारचें समाधान तोंडावर चमकत होतें व तें पाहून आम्हालाहि कृतार्थ वाटलें.  हा येनान भाग चीनमधील अत्यंत दरिद्री भाग आहे.  लढाईमुळें तर आणखीन कठीण दशा आली आहे.  कारण जें कांही थोडेंफार चांगले असेल तें आघाडीवर शिपायांसाठी पाठवावें लागतें.  अशा स्थितींतहि त्या लोकांच्या तोंडावर तें तेज कोठून बरें आलें?

कारण येथील शेतकरी आज जमिनीचा मालक झाला आहे?  तो आज स्वत:साठी नांगरतो.  कोणा जमिनदारासाठी किंवा सावकारासाठीं नाहीं.  आपले पिकविलेलें उद्यां पळवलें जाईल अशी भीति नसते.  विलासांत राहणा-या चंदुलालसाठीं जो श्रमत नसतो ; बाण्डगुळांसाठी तो रमत नसतो.  तसेच कामगार काम करतो तो यंत्राचा वा मालकाचा गुलाम म्हणून नाहीं.  कामगारच जणूं आज मालक आहेत.  काम जो करणार नाहीं, त्याला खायला मिळणार नाहीं, असा समाजाचा नीतिनियम आहे.  येथे सोव्हिएट समाजवादी पध्दति स्थापन झाल्यापासून ऐतखाऊ श्रीमंत जमिनदारांकडून जमिनी काढून घेण्यांत आल्या.  व त्या किसानांत वाटल्या गेल्या.  सारे अयोग्य कर कमी करण्यांत आले.  जेवढें पिकेल त्यांतील कांही भाग शेतकरी सरकारला देतो.  सहकारी तत्त्वाचा खूप प्रचार झाला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel