चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ॥
ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व ॥
प्रपंच सुख दुःख तुझें वैभव ॥
अखिल जन नेणति हा गुह्य भाव ॥१॥
जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥
पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांति ॥जयदेव ॥धृ०॥
निगमादिक वर्णिंतां नकळेचि पारु ॥
भक्त जन कृपाळु हा मोरेश्वरु ॥
साघुपरिपालना धरिला अवतारु ॥
निर्विकल्प सेवा हा कल्पतरु ॥जयदेव० ॥२॥
शंकर जन ऐसीं पुराणें गाती ॥
परि सकळांचा जनिता हा मंगलमूर्ति ॥
अगाध याचा महिमा नकळे कल्पांतीं ॥
थोर पुण्य प्राप्ती सेवा ही मूर्तिं ॥जयदेव० ॥३॥
निजभावें पुजन आरतियुक्त ॥
क्षीराब्धी नाना फळें आणिति भक्त ॥
एक आरति पहाति पूजन नित्य ॥
निंदः कपटी बुद्धि ठकले बहुत ॥जयदेव० ॥४॥
मोरयागोसावी भक्त किंकर ॥
थोर भाग्य माझें हा मोरेश्वर ॥
निंदः कपटी बुद्धि नेणति हा पार ॥
गोसावी न ह्मणावा हा मोरेश्वर ॥जयदेव० ॥५॥
विरक्त साधूशील नेणति कुसरी ॥
महानुभावामध्यें अगाध ही थोरी ॥
सर्वांभूतीं भजन समानवैखरी ॥
पाहाति हीं पाउलें धन्य संसारीं ॥जयदेव० ॥६॥
भक्तराम ह्मणें मोरेश्वरमूर्ति ॥ नित्यानंद शरण कल्याण कीर्तिं ॥
तोडिसी मायाजाळ संसार भ्रांति ॥ अंत किती पाहसी नागाननव्यक्ति ॥जयदेव० ॥७॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel