आरती दत्तराजगुरुची ।

भवभयतारका स्वामीची ॥ धृ. ॥

दिगंबर, उग्र ज्याची मूर्ती ।

कटिवर छाटि रम्य दिसती ॥

चर्चुनि अंगिं सर्व विभुती ।

कमंडलु धरोनियां हाती ॥ चाल ॥

पृष्ठी लोळे जटेचा भार ।

औदुंबरतळी, कृष्णेजवळीं, प्रभातकाळीं, वर्णित भक्त कीर्ति ज्याची॥

दिगंतरी वाहे कीर्ति ज्याची ॥ आरती. ॥ १॥

अनुसयेच्या त्वां पोटी ।

जन्म घेतला जगजेठी ॥

दिव्य तव पादभक्तिसाठी ।

जाहली अमित शिष्यदाटी ॥ चाल ॥

राज्यपद दिधलें रजकाला ।

जो रत जाहला, त्वत्पदकमला,

किमपि न ढळला, पाहुनि पूर्ण भक्ति त्याची ॥

अंती दिली मुक्ती त्वांची ॥ आरती. ॥ २ ॥

सती तव प्रताप ऎकोनी ।

आली पतिशव घेवोनी ॥

जाहली रत ती तव चरणी ।

क्षणभंगुर भव मानोनी ॥ चाल ॥

तिजला धर्म त्वांचि कथिला ।

जी सहगमनीं, जातां आणुनी,

तीर्थ शिंपुनी, काया सजिव केलि पतिची ॥

आवड तुज बहु भक्तांची ॥ आरती. ॥ ३ ॥

ऎसा अगाध तव महिमा ।

नाही वर्णाया सीमा ॥

धनाढ्य केला द्विजोत्तमा ।

दरिद्र हरुनी पुरुषोत्तमा ॥ चाल ।

नेला तंतुक शिवस्थानी ।

वांझ महिपिसी, दुग्ध दोहविसी,

प्रेत उठविसी काया बहुत कुष्ठि ज्याची ॥

केली पवित्र ते साची ॥ आरती. ॥ ४ ॥

ठेवुनि मस्तक तव चरणी ।

जोडुनि दामोदर पाणी ॥

ऎसी अघटित तव करणी ।

वर्णू न शके मम वाणी ॥ चाल ॥

अहा हें दिनानाथ स्वामिन् ।

धाव दयाळा, पूर्ण कृपाळा, श्रीपद्मकमळा परिसुनि विनंती दासाची ॥

भक्ती दे त्वत्पदकमलाची ॥ आरती. ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel