या गांधी टोपींत मला भुकेलेल्या लाखो बंधुभगिनींचीं रूपें दिसतात. या गांधी टोपींत मला सत्याग्रहाचे संग्राम दिसतात. या गांधी टोपींत लाठीमार दिसतात, गोळीबार दिसतात, फांशी गेलेले हुतात्मे दिसतात. ३० सालीं ३२ सालीं सरकारनें सूतशाळा जप्त केल्या, चरके जाळले, टकली हातांत घेणारांवर लाठीहल्ले चढविले. या टकलीसाठीं लोकांनीं तुरुंगांत उपवास केले. त्या चळवळींत गांधी टोपी घालणारास नोकरीस मुकावें लागलें. गांधी टोपींतील शक्ति सरकारनें ओळखली होती. टकली समोर तोफाबंदुकवाला टरकतो हें दृश्य दिसत होतें. खादींतील अनंत शक्ति सरकारनें ओळखली, परन्तु अभागी व बुध्दिहीन लोकांनीं ओळखली नाहीं; ते खादीची टरच करीत बसले.

जेथें जेथें खादीचा संदेश गेला होता, तेथें तेथें चळवळ अफाट पसरली होती. खानदेशांतच पहा. असोदे गांवांतून शेंदीडशें तरुण उठले; खिंरोदें गांवांतून तसेच तरुण उठावले. मुकटी येथून व कापडणें येथून जास्तींत जास्त लोक तुरुंगांत गेले. वर्धा तहशील मधून ५५० बाया तुरुंगांत गेल्या. हा प्रचार कोणी केला ? खादीनें. ही ऊबदार खादी थंडगार हृदयें देशभक्तीनें पेटवते. खादीच्या पाठोपाठ राजकारण जातें. खादीनें जो घांस दिला जातो त्या घांसाला स्वातंत्र्याचा वास लागतो. म्हणून आमच्या स्वातंत्र्याचें खादी हें प्रतीक बनलें आहे.

खादीनें राष्ट्राला संघटित केलें आहे. या सुतानें सार्‍या प्रांतांचीं हृदयें एकत्र जोडलीं आहेत. वर वर अलग दिसणारे प्रांत आंत खालीं खोल सुताच्या धाग्यानें जोडले जात आहेत. खादी म्हणजे महती संघटना. खादी म्हणजे खोल आंतरिक ऐक्य. राष्ट्रीय संसारांत आज खादी शिरोभागीं आहे.

गरिबांना स्वाभिमानाचें अन्न देणारी, स्वातंत्र्य युध्दाचें प्रतीक झालेली अशी खादी कोण आदरणार नाहीं ? कोण अंगावर घालणार नाहीं ? अशा या खादीची मंगल टोपी कोण आपल्या डोक्यावर घालणार नाहीं ? 'सर्वेषु गात्रेषु शिर: प्रधानम्' सर्व अवयवांत डोकें महत्त्वाचें. असें हें डोकें आधीं खादीनें नटवा. नवीन काळाला नवीन मंत्र, नवीन शास्त्र, नवीन वस्त्र. आजची राष्ट्रमातेची उपासना खादी परिधान करूनच करावयाची आहे. आज नको पागोटें, नको रुमाल, नको मंदील. आजच्या युगाचें चिन्ह गांधी टोपी.

राष्ट्राचें मंगल करणार्‍या गांधी टोपीहून दुसरी मंगल वस्तु कोणती ? राष्ट्राचें तोंड उजळ करणार्‍या गांधी टोपीहून दुसरें निर्मळ शिरोभूषण कोणतें ? समुद्राच्या लाटा आदळतात, उसळतात व त्यांतून स्वच्छ शुभ्र फेंस बाहेर पडतो. आमच्या चळवळींचें सार म्हणून ही गांधी टोपी वर आली आहे. ही शुभ्र स्वच्छ टोपी आदरा.

चार लाख टोप्या खपविणें का जड आहे ? संयुक्त खानदेशची २० लाख लोकसंख्या आहे. त्यांतून १० लाख बायका वजा करा. आणखी दोन लाख अर्भकें, लहान मुलें दूर करा. तरी ८ लाख लोक टोप्या घालणारे निघतील. दोन्ही खानदेशांतच ४ लाख टोप्या वास्तविक खपल्या पाहिजेत. मग सर्व महाराष्ट्रांत खपविणें का अशक्य आहे ?

उठा, सर्व मराठी इंग्रजी शाळेंतील मुलांनो ! गांधी जयंतीस गांधी टोप्या घ्या. सार्‍या शाळांतून ही स्वच्छ शुभ्र देशभक्तीची प्रचंड लाट उसळूं दे. शाळांतील शिक्षकांनो ! सर्वत्र ही गोष्ट पसरा, सांगा. सर्व कामगारांनो ! तुमच्या खेड्यांतील मायबहिणींची, भावांची अब्रू सांभाळणारी ही खादी, तिचीच तुम्ही ही टोपी घ्या शेतकर्‍यांनो, तीं लाल पागोटीं दूर करून स्वातंत्र्याचें चिन्ह असणारी ही टोपी डोकीवर चढवा. उठा व्यापार्‍यांनो, या टोप्या खरेदी करून दुकानांतील सर्वांना द्या. उठा सर्व पांढरपेशांनो, ही स्वातंत्र्याची पताका घरोघर न्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel