सकाळचा राउंड संपवून मी आणि माझा मित्र बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो. बँकेचे काम आटोपून आम्ही हॉस्पिटलला आलो आणि पार्किंग कडे गाडी लावायला जात होतो इतक्यात आमच्यासमोर एक माणूस भोवळ येऊन पडला, मी उतरलो आणि त्याच्याकडे धावलो मित्राला सांगितलं गाडी पार्क करून ये, जवळच हॉस्पिटलच कॅन्टीन होतं तिथून कोणीतरी कांदा घेऊन त्याच्या नाकाला लावत होतं. तो पर्यंत मी तिथे पोचलो, त्याला बघितलं त्याचे हृदयाचे ठोके बंद पडले होते. मी लागलीच त्याला कार्डियाक मसाज द्यायला लागलो(कार्डियाक मसाज मध्ये पिक्चर मध्ये दाखवतात तस छातीवर बुक्क्या मारत नाहीत तर चेस्ट बोन वर जोर देऊन मेंदूचा रक्त प्रवाह सुरु ठेवायचा असतो). एकाला स्ट्रेचर आणायला सांगितले आणि त्या माणसाला तातडीच्या सेवेच्या ठिकाणी आणलं. मग त्याला भराभरा इन्जेक्शनस दिली आणि त्याला ७-८ शॉकचे झटके दिले, श्वासाची नळी घातली. सर्व लोकं म्हणाले काही फायदा नाही, तरी आम्ही प्रयत्न सुरु ठेवले १/२ तासाने त्याच हृद्य सुरु झालं. त्याला आम्ही अतिदक्षता विभागात ठेवले, त्याला कृत्रिम श्वासोच्छवासाच्या मशीनवर ठेवण्यात आलं. त्याला असा अचानक का झालं याचा शोध घेतला तर त्याला हृदयविकाराचा झटका आला होता, त्याच्या हृदयाच्या तिन्ही मुख्य वाहिन्या ब्लॉक झाल्या होत्या त्यातली १ १००% ब्लॉक होती आणि २ ९०% पेक्षा जास्त ब्लॉक होती. ५-६ दिवसांनी तो शुद्धीवर आला आणि १०-१२ दिवसांनी त्याला वार्डमध्ये शिफ्ट केला. योगायोगाने तो आमच्याच युनिटमध्ये अॅडमिट होता त्यामुळे मी त्याला दररोज तपासणार होतो, त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना माहित नव्हतं कि त्याला अॅडमिट करणारा मीच होतो ते, तो आता इतका चांगला झाला होता कि तो आता फिरायला लागला होता, मी त्याला विचारलं “आता कस वाटतय?” तो म्हणाला “सगळ चांगलं आहे पण डॉक्टरांनी माझ्या छातीवर एवढ दाबलय कि माझ्या २ फासळ्या तुटल्यात, लई दुखतंय बघा” मी त्याला पेनकिलर चा औषध दिलं आणि काही मलम लावायला दिलं आणि म्हणालो “जाऊदे काका जीव वाचला ते चांगलं, ते फ्रॅक्चर काय ३-4 आठवड्यात भरेल”. त्याला बायपास ऑपरेशन सांगितलं होत, पण त्याच्याकडे पैसे नव्हते चॅरिटी ऑफिस ने त्याचा आत्तापर्यंत पूर्ण खर्च केला होता, ते त्याच्या ऑपरेशन चा निम्मा खर्च उचलायला तयार होते, पण तो नाही म्हनाला म्हणून त्याला औषधांवर घरी पाठवला. त्याचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आणखी एक अशीच घटना पुढे काही महिन्यांनी घडली, १ पन्नाशीचा माणूस त्याला १ वर्षापूर्वी सौम्य अर्धांगवायूचा झटका आला होता व तो मधुमेही आहे हे तेंव्हा समजलं होतं. तो वर्षभर काही हॉस्पिटलला फिरकला नाही, त्याची बहिण डॉक्टर होती आणि ती त्याला मधुमेहासाठी उपचार करत होती, त्याला २ दिवस धाप लागत होती आणि त्याची शुगर कंट्रोल मध्ये अजिबात नसायची, २ दिवस बहिणीने फोन वरून काही औषधं सांगितली पण त्याने काही फरक पडला नाही. घरच्यांनी त्याला हॉस्पिटल आणायचं ठरवलं आणि हॉस्पिटल ला येतानाच घरच्या जिन्यावर त्याचे हृदयाचे ठोके बंद पडले, घरच्यांना काहीच कळाल नाही आणि त्याला रिक्षात घालून हॉस्पिटलला आणेपर्यंत अर्धा-पावून तास झाला होता. हृदयाचे ठोके बंद झाल्यावर जर १० मिनिटाच्या आत कार्डियाक मसाज सुरु केला नाही तर ती व्यक्ती १००% दगावते, तरी आम्ही १/२ तास प्रयत्न केला पण या वेळी मात्र काळही आला होता आणि वेळही. काही वेळाने तिची डॉक्टर बहिण आली तिला आम्ही त्याचा मृत्यूची बातमी दिली, ती म्हणाली “असा कस शक्य आहे”. मी म्हणालो “जर मधुमेह कंट्रोल मध्ये नसेल तर बऱ्याचदा हृदयविकाराचा झटका आला तरी दुखत नाही आणि अश्या वेळी फक्त दम लागतो, ते जर काल आले असते तर आज परिस्थिती वेगळी असती”. खिन्न मनाने तिच्या भावाचा देह ती घेऊन गेली. या दोन्ही घटना तश्या सारख्याच आहेत फक्त पहिला हॉस्पिटलच्या आवारात पडला म्हणून वाचला आणि दुसरा हॉस्पिटलच्या बाहेर पडला म्हणून गेला. दोघांचही नशिबच म्हणायचं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel