IMG-20130405-00229जिभेवरची चव कधीच विसरली जात नाही, कारण ती तुमच्या मेंदू मधे कायम कोरलेली असते. हेच वाक्य पूर्वी पण एकदा एका लेखात वापरले होते, आज पुन्हा आठवले म्हणून लिहिले. नॉनव्हेज हे नेहेमी एखाद्या गावाशी निगडित असले पाहिजे का? बाहेर पडलो, की बरीच कोल्हापुरी, मालवणी, किंवा चुकून एखादे नागपुरी सावजी हॉटेल दिसते.

प्रत्येक ठिकाणच्या नॉनव्हेजची चव ही त्या त्या ठिकाणाशी जवळीक दाखवणारी असते असे म्हणतात. जसे कोल्हापूरी म्हटले की पांढरा रस्सा , तांबडा रस्सा आठवतो, मालवणी म्हटले की मांदेली, बांगडा, सुकट, मसल्स वगैरेची चव एकदम आठवतो. कोंकणी म्हटलं की गोवनीज कच्चा मसाला वापरून केलेली फिश करी, भरपूर व्हिनेगर घालून केलेली रेषाद वगैरे आठवते.एखाद्या हॉटेल मधे शिरलो, की त्या हॉटेल मधल्या पदार्थाची चव कशी असेल हे मेंदू मधे आधीच ठरवलेले असते , आणि आपला मेंदू त्या चवीसाठी तयार असतो.

बहुतेक शेट़्टीच्या हॉटेल मधल्या नॉनव्हेजची चव एकसारखीच असते. वेगळी चव म्हटलं तर सावजी चिकन. आमच्या नागपूरच्या सावजी चिकन मधे भरपूर काळी मिरी घातलेली असतात. या तिखटपणाचं खरं रहस्य म्हणजे ते काळी मिरी. केवळ नावाला , दहा पंधरा मिरे वापरून सावजी चिकन तयार होत नाही.सावजी चिकन हे चिकन इन ब्लॅक पेपर करी म्हणून सहज खपून जाईल.

IMG-20130405-00221लग्नापूर्वी नागपूरला असतांना, आमच्या संध्याकाळच्या पार्टी मधे एका डीश मधे सावजी रस्सा, आणि ओल्ड मॉंक म्हणजे आमची चैन करण्याची परम सीमा होती. सावजी कडे जेवायला गेलो की आमचा मित्र दिलीप मुंडले हमखास एक जोक मारायचा. आज जेवल्यावर उजव्या हाताचा वास, घे, पण उद्या मात्र चुकूनही डावा हात नाकाजवळ नेऊ नकोस” :). लग्नानंतर सगळ्यांचीच बायको आल्याने हळू हळू तो सावजी इव्हिनिंग अड्डा बंद झाला. पण तरीही दिवाळी च्या पूर्व रात्री मात्र एक बैठक व्हायचीच आमची!

कोल्हापुरी चं नाव बदनाम करण्यात शेटटी हॉटेल चा हातभार भरपूर लागलेला आहे. लाल रंग घालून पंजाबी स्टाइल मसाल्यात शिजवलेले चिकन , आणि वर खोचलेली तळलेली लाल सुकी मिरची लावली की कोल्हापुरी झालं असे या हॉटेलवाल्यांना वाटते.

IMG-20130405-00224कोल्हापुरी म्हणजे नुसतं तिखट असतं का? छेः, मला नाही वाटत. कोल्हापुरी हे तिखट कधीच नसतं . कोल्हापुरी घरी कांडलेल्या लाल मिरच्यांची चव ही त्याची युएसपी. कोल्हापुरी आणि सावजी बद्दल लोकांचा एक गैरसमज आहे की हे दोन्ही प्रकार खूप तिखट असतात म्हणून.

सावजी म्हणजे एक चव आहे. सावजी चिकन चा फ्लेवर हा खास मुरवलेला असतो चिकन मधे.माझा एक मित्र सावजी होता, तो घरीच सावजी चिकन बनवायचा. सावजी चिकन बनवण्याची एक खास पद्धत आहे. तेला मधे कांदा, मसाला, मिरची वगैरे व्यवस्थित भाजून घेतल्यावर त्या मधे चिकन टाकुन ते शिजवून घ्यायचे असते – अजिबात पाण्याचा थेंबही न घालता. एकदा तुम्ही शिजवताना पाणी घातलं की बोन्स ला चिकटलले फ्लेश सुटून मोकळे होते. खऱ्या सावजी हॉटेल मधे तुम्हाला असे कधीच सापडणार नाही. चिकन शिजवायचं तर ते तेला- मसाल्याच्या वर!

जर ही कोल्हापुरी आणि सावजी चव एकाच ठिकाणी सापडली तर? होय, तो शोध नुकताच लागला मला .

पुण्याला गेलो होतो, दुपारी नेहेमीप्रमाणे ठरलेल्या हॉटेल मधे निघालो. खास पुण्याचाच असलेला एक मित्र पण सोबत होता, तो म्हणाला, की इथे एक नवीन हॉटेल सुरु झालेले “रानमळा” नावाचे आहे तिकडे जाउ या. त्या हॉटेल मधे गेल्यावर ह्या सगळ्या चवी एकत्र पणे सापडतात. सावजी चिकन + सोलकढी वगैरे असे भन्नाट कॉंबो पण ट्राय करता येतं इथे आल्यावर. हवं तर सोबतीला एखादा बांगडा/मांदेली मागवू शकता, तोंडीलावणं म्हणून.

हे रानमळा आहे तरी कुठे?? तर चिंचवड पासून अगदी जवळ आहे. वाल्हेकर वाडी रोड वर असलेले, तसं म्हटलं, तर गावाबाहेर असलेले हे हॉटेल आहे. तिकडे दुपारी गेलो तर अगदी खरोखरीच रानमळ्यात गेल्याचा फिल आला. खरं तर हे एक फॅमिली रेस्टॉरंट आहे. बरोबर असलेला मित्र कोथरूड ला रहातो, म्हणाला, रात्री बरेचदा बायकोला घेऊन इकडेच जेवायला येत असतो, पण आम्ही चक्क दुपारी गेल्याने तशी फारशी गर्दी नव्हती.

आत शिरल्यावर काय ऑर्डर द्यायची हे ठरवणे फार अवघड नव्हते. आत शिरतांना इतरांच्या समोर प्लेट मधे काय आहे या कडे लक्ष गेले होतेच, आणि मी सध्या डायट वर असल्याने ( नो रेड मिट ) चिकन मागवणे हे तर नक्की होतेच. मेन्यू कार्ड पाहिल्यावर लक्षात आलं, की भाव एकदम कमी आहेत.

IMG-20130405-00222जेवणाबद्दल जास्त काही लिहत नाही. कोल्हापुरी + सावजी स्टाइलचे जेवण आहे इथले. चिकन करीचा मसाला एकदम बेश्ट! करी पण काळपट सावजी करी शी साधर्म्य दाखवणारी! थोडक्यात, थोडा कोल्हापुरी/सावजी चा टच पण आहे. आणि काळा मसाला ( मिरे) भरपूर वापरल्याने थोडा सावजी सारखा पण फ्लेवर होता. मी चिकन मागवले तर मित्राने मटन करी भाकरी. मटन थाळी मधे सुके मटन+ खिमा पण देतात. इथे खिमा खास बोलाईचाच असतो, मुंबई च्या इराण्या प्रमाणे ” बडे” का नाही. सुरुवातीला आलेला खिमा संपवल्यावर पुन्हा एक प्लेट खिमा मागवला. खिमा एकदम अप्रतिम :) नो कम्पॅरिझन! चव एकदम घरच्या सारखी. मित्राने मागवलेल्या मटन थाळी सोबत कोल्हापुरी स्टाइल चा पांढरा रस्सा, तांबडा रस्सा होताच.म्हणजे कोल्हापूरकर पण एकदम खूश होतील इथे आल्यावर.

थाळी सोबत चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी पण मिळते. मी चक्क जीरा राइस + चिकन करी वर आडवा हात मारला. पण जेंव्हा मित्राच्या पानातली बिर्याणी पाहिली , तेंव्हा मात्र चिकन थाळी घेण्यात जरा चूकच केली की काय असे क्षणभर वाटले :) आपला स्वभावच आहे, खाण्याच्या बाबतीत समाधान म्हणून कधी वाटतच नाही :)

IMG-20130405-00219सहज आठवलं म्हणून लिहितो. पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण १९८५ च्या सुमारास सोमाटणे फाट्यावर एक हॉटेल होते. एक लहानसे धाबा स्टाइलचे हॉटेल. तुम्हाला बसायला वेळ असेल तर तुमच्या समोर चिकन तयार करून द्यायचा तो. त्या ठिकाणी खास याच चवीचा चिकन /मटन रस्सा मिळायचा. तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या साठी गेल्यावर तुमच्या समोरच एकदम फ्रेश चिकन अगदी ड्रेसिंग करण्यापासून तयार केले जायचे. असायचे . दर बुधवारी आमची कट़्टा गॅंग नेहेमी तिकडे बसायची :). पण नंतर ते हॉटेल बंद पडून त्याच ठिकाणी एक मोठं हॉटेल झालेले दिसले, तिथे पण एकदा गेलो होतो, पण आता मात्र एकदम बेकार झालंय ते हॉटेल.

पुणेकरांनो, एकदा तरी इकडे चक्कर मारायला अजिबात हरकत नाही. पिंपरी चिंचवड भागातल्या लोकांसाठी एक खास फॅमिली जॉइंट म्हणून याची आठवण ठेवा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel