ह्या दोन शब्दांमधे किती अंतर आहे? तसं म्हंटलं तर खुप आहे, किंवा अजिबात नाही म्हंट्लं तरीही चालेल.  हे दोन शब्द मनातल्या मनात नेहेमीच फुगडी खेळत असतात. आता फुगडी या साठी म्हणतो, कारण हे दोन्ही शब्द नेहेमी मुलीच वापरतात.बरं ह्या दोन शब्दांमधे साम्य कुठलं?? तर  हे शब्द नेहेमीच मेलेले असतात.. म्हणजे  जसे.चावट मेले, किंवा वात्रट मेले.. :)

लग्नाआधी जेंव्हा लग्न ठरलं असतं किंवा ठरण्याच्या बेतात असतं, तेंव्हा तुम्ही कांहीही करायचा प्रयत्न केला, किंवा थोडा पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला की, “च्च्यल्ल, उग्गिच चावटपणा  करु नकोस..” असं म्हणणारी , जेंव्हा ह्या चावट्ट शब्दावरुन जेंव्हा आता बस्स!! वात्रटपणा पुरे…. अशा वाक्यावर  घसरते तेंव्हा लग्नाला कांही वर्षं झाले असे समजायला हरकत नाही.

बरं गम्मत अशी की ह्या दोन्ही शब्दांचे डिक्शनरीत दिलेले अर्थ.. सहज गम्मत म्हणुन पाहिले आज, तर काय असावेत?

चावट = ईन्डिसेंट, ऑब्सेन, व्हल्गर,रुड, क्रूड, डर्टी, ग्रॉस, इम्प्रॉपर.. असे आहेत.. इतका रोमॅंटिक शब्दं आणि त्याचे असे अर्थ?? बहुत ना इन्साफी है ये..

बरं वात्रट= मिस्चिव्हस..

म्हणजे बघा, लग्ना पुर्वी जो चावट असतो तो लग्नानंतर वात्रट होतो..  गम्मत आहे की नाही??मला वाटतं की मुलींना या शब्दांचा नेमका अर्थ माहिती नाही, म्हणुन  लग्ना पुर्वी चावट आणि लग्ना नंतर वात्रट शब्द वापरतात मुली ..

हे दोन शब्द आज कां आठवले?? दर वर्षी दिवाळी आली की लहानपणी मुलांचे मासिक, किंवा फुलबाग ( निटसं नांव आठवत नाही, पण या मासिकात सगळे रंगित प्रिंटींग असायचं, गुलाबी, निळा ,हिरवा फॉंट वापरुन ) आणि चांदोबा चा दिवाळी अंक कधी येतो याची वाट पहायचो, पण थोडं मोठं झाल्यावर या मासिकांच्या ऐवजी ’आवाज’ ची वाट पाहु लागलो.

’आवाज’ !! पाटकरांचा आवाज.. वात्रट वार्षीक आवाज!! बस्स! एकच शब्द आठवतो आवाज म्हंटलं की- वात्रट पणाचा कळस असलेलं वार्षीक !!  चावटपणा, वात्रटपणा आणि अश्लिल पणा.. या मधे एक लहानशी अस्पष्टं रेषा असते. आज पर्यंत आवाज च्या प्रत्येक अंकामधे ती रेषा कधिही ओलांडल्या गेली नव्हती.  आवाज चा वात्रटपणा हवा हवासा वाटायचा. आवाज चा अंक आला की तो वाचुन पुर्ण झाल्याशिवाय खाली ठेवला जात नव्हता.

दिवाळी मधे फराळासोबत मनाला, गुदगुल्या करणारा, थोडा वात्रट थोडा चावट असलेला  आवाज चा अंक असल्याशिवाय दिवाळी आहे असं वाटायचंच नाही.

पण…. आज जेंव्हा या वर्षीचं आवाज आणलं लायब्ररीतुन.. तेंव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आवाज च्या अंकामधे काय आणि किती लिहायचं, कुठपर्यंत ताणायचं, याचं तारतम्य न बाळगल्या मुळे आवाज चा यंदाचा अंक अतिशय अश्लिल  झालाय. लहानसे जोक्स पण अश्लिलते कडे झुकणारे वाटले.  मला थोडं फार चावट वगैरे वाचायला अजुनही आवडतं.. :)    (कन्फेशन म्हणा हवं तर) पण अश्लिल आवडतं नाही..

आवाज च्या ’खिडक्या’ ज्या पहातांना थोडी हुर हुर वाटायची-की काय असेल बॉ आतमधे??.. ती आता अश्लिल पणा कडे झुकल्या मुळे  निराशा झाली. इतकी की  घरी आणलेलं मासिक मुलिंच्या हातात पडु नये म्हणुन कपाटात ठेवावं कां ? असंही वाटंत होतं.

बरं विनोदी कथा वगैरे म्हणाव्या, तर सगळ्या कथा, अगदी प्रतिथयश लेखकांच्या पण एकदम रटाळ आहेत. एकंदरीत काय.. तर पाटकर गेल्या पासुन ’आवाज’ बसलाय…  पार बोऱ्या वाजलाय आवाजाचा…पुढल्यावर्षी पासुन आवाज वाचणे बंद!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel