''नयनाताई, रात्रीं झोंपलां नाहीं वाटतें ? किती सुंदर चित्र, खरेंच किती छान.''
''लते, हें रंगानें काढलेलें चित्र आहे. बोटें माझीं, प्रेरणा त्याची. माझ्या बोटांत कोणी तरी शिरला होता, घुसला होता. मला खोलींत रंगा दिसला. आणि मी हें चित्र रंगवित बसलें. मी ? माझ्या व्दारा रंगाच सारें करित होता. मी जणूं त्याच्या हातांतील साधन बनलें होतें,  माध्यम बनलें होतें.''

''नयनाताई, रंगाजवळ तुमचें चिरलग्न लागलेलें आहे. ते तुमच्याशीं एकरुप आहेत. तुमच्या बोटांत आतां दोघांची कला. तुमच्या चित्रांत दोघांचे गुण उतरतील. तुम्ही दु:खी निराश नका होऊं. उठा, तोंड धुवा.''

एके दिवशीं मणी नि तिची आई नयनाला भेटायला आलीं होतीं.
''नयना, हीं माझीं नवीन चित्रें. तुम्ही सुटल्यावर आमच्याकडे या. आमचें घर तुमचें. मीं तुमच्या खोलींतच बसतें, निजतें. तुमची खोली मी सजवली आहे. लौकर या.''

''मणी, हीं इतकीं फळें कशाला ?''
''तुमच्या मैत्रिणींना, सर्व सत्याग्रही भगिनींना''
''बध्दाने आपवा माटे'' मणीची आई म्हणाली. भेट चालली होती. तों एकदम नयना सुटल्याची बातमी आली. तयारी करा, तयारी करा, असें येऊन शिपायी म्हणाला.

''आमच्या मोटारींतूनच तुम्हांला नेऊं. किती छान ! आम्ही वेळेवर आलों. नाहीं नयनाताई ?''

मणि नी तिची आई बाहेर जाऊन वाट बघत बसलीं. नयनानें सारें आंवरलें. तिनें सर्वांचा निरोप घेतला. तिनें लता, विजया, इंदु वगैरेंना चित्रें भेट म्हणून दिलीं.

''नयनाताई, माझें हें घड्याळ तुम्हांला घ्या. तुमच्या हातांत सुरेख दिसतें. मिनिटा मिनिटाला माझी आठवण येईल.''

लतेनें आपलें घड्याळ नयनाच्या हातांत बांधलें. त्या जणूं दोघी बहिणी झाल्या होत्या.

नयना सुटली. बाहेर मणि होती. ती धांवली. तिनें नयनाच्या गळ्यांत पुष्पहार घातला, हातांत गुच्छ दिला.

''कोठून आणलींस हीं फुले ?''
''मोटारीनें पटकन् जाऊन आणलीं.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel