''ताई, तूंहि तशीच आहेस. मनाच्या किती धडपडींतून तूं गेलीस. रात्रंदिवस तुझ्या मनांत नाना वृत्तिप्रवृत्तींचा तुमुल झगडा होता. तूं त्यांतून पार पडलीस. तुझा मनश्चंद्र निर्मळपणें पुन्हां शोभूं लागला. परंतु ताई दु:खी कष्टी नको असूं. रंगाला त्यामुळें वाईट वाटतें. वैराग्यहि हंसणारें असावें, आनंदी असावें. महात्माजींच्या हास्यासारखी सुंदर वस्तु नाहीं म्हणतात. जवाहरलालांची आत्मकथा मी वाचली. तिच्यांत ते म्हणतात गांधीजींचें मुक्तहास्य ज्यानें पाहिलें नाहीं, ऐकलें नाहीं, त्यानें फारच मोठी गोष्ट गमावली. ताई, वैराग्य दु:खी कष्टी नको. झाडाला वर फूल यावें त्याप्रमाणें धडपडणार्‍या जीवनाला असें प्रसन्न अनासक्तीचें, विरक्ताचें फूल लागावें. ताई, मी का हें तुला सांगावें ? मी संसारांत रमावें आणि तुला वैराग्याच्या गोष्टी सांगाव्या हें अनुचित आहे. ताई, मी तुला एक विचारुं ? तूं खरेंच का अत:पर संन्यासिनी राहणार ? तुझे माझें वय जवळ जवळ सारखें; चारपांचवर्षांचा फरक असेल. परंतु तूं किती दिव्यांतून गेलीस. ताई, अशी का तूं खिन्न ?''

''काय सांगू नयना ? मी एक चंचल स्त्री आहे.''

''आपण सारींच अधूनमधून चंचल असतों. तरीहि सर्व जीवनांत एक सुसंगति असते. रस्ता का नेहमीं सरळच जातो ? तो वेडावांकड गेला तरी एक अखंड रस्ताच.''

''नयना, रंगाचे मित्र परवां आले होते ना ?''
''ते लढाईवर गेले ते ?''

''हो. त्यांना पाहुनहि माझ्या शतस्मृति जणूं जाग्या झाल्या. मी का त्यांची कोणी पूर्वजन्मींची होत्यें ?''

''तूं रंगाजवळ बोललीस ?''
''नाहीं. कोणाजवळ कशाला बोलूं ?''

''पंढरीला जर प्रेमसंबंध निर्माण झाला असता तर तो असा मरायला जाताना बेफिकीर वागताना.''

''नयना, कशाला हीं फुकट बोलणीं ? माझीं दु:खें, माझ्या निराशा, माझें चांचल्य, सारें मला भोगूंदे, अनुभवूंदे. माझ्या जीवनाची नि:सारता नि भेसुरता मला अनुभवूंदे. तूं घरी जाऊन ये. रंगाला वांचव. तांतडी करायला हवी. या दहा बारा दिवसांत तर तो अधिकच थकला. तरी चित्र काढीत बसतो.''

''तेंच त्यांचे अमृत रसायन. तो त्याचा प्राण.''
''नयना, ज्याचें मरण कदाचित् ओढवेल लौकरच, अशाजवळ लग्न करायला तुम्ही कशा तयार झाल्यात ?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel