''तें प्रदर्शन तहकूब झालें आहे.''
''युध्द कधीं तरी संपेल. त्यावेळेस कोणीतरी पुन्हां जीवनाकडे, कलांकडे, वळतील. मी त्यावेळेस नसेन. तूं ही चित्रें पाठव.''

''रंगा, मी तुला बरें करीन. तुला घेऊन जाईन. महाबळेश्वर, माथेरान, उटी, कोठें नेऊं सांग. बाबा मला पैसे देतील. ते रागावणार नाहींत. क्षणभर रागावतील. परंतु पुन्हां मुलीला जवळ करतील. तें उदार पितृहृदय का कायमचें कठोर होईल. शेवटीं माझ्या कृतार्थतेंतच त्यांची कृतार्थता. रंगा, मी आतां येथून जाणार नाहीं. मला तुझी होंऊं दे.''

''किती तुला समजावूं ? माझी घटका भरत आली आहे.''
''ती लग्नघटका आपण समजूं. रंगा, या जगांत तुझी म्हणून मला जगूं दे. तुझा देह जाणारच असेल तर काय उपाय ? परंतु मी तुझ्या देहाजवळ केवळ लग्न लावित नसून तुझ्या थोर आत्म्याजवळ लावित आहे. तो आत्मा अमर आहे. तो कोण हिरावून नेईल ? रंगा, हे तुझे हात माझे होऊं देत. तूं जाणारच असलास तर तुझे हात माझ्या हातांत. देऊन जा. तुझी कला माझ्या हातांत, माझ्या बोटांत ठेवून जा. हे हात माझे आहेत. सातजन्मांचे माझे.''  तिनें त्याचें हात हृदयाशीं धरले. ती ते खाऊं लागली.

''हें काय नयना ?''
''तुझी कला चुंबून घेतें.''
''वेडी आहेस.''

नयना उठून गेली. वरतीं गच्चींत जाऊन बसली. राममंदिराचा कळस दुरुन दिसत होता. किती तरी वेळ ती बसली होती. सुनंदा, ताई आलीं तरी तिला कळलें नाहीं.

''नयना, चल खालीं. गार वारा सुटला आहे. पाऊसहि येईल.''
''पाऊसच मला हवा आहे. सुकलेलें जीवन अंकुरित होईल, हिरवें हिरवें होईल. आई, बसा. तुमच्या नयनाला एक भिक्षा घाला.''

''काय म्हणतेस तूं ?''
''रंगाचें नि माझें तुम्ही लग्न लावा. तुमच्या पवित्र हातांनी आमचे हात एकमेकांच्या हातांत द्या. मला नाहीं म्हणूं नका.''

''रंगा आजारी. त्याचा भरंवसा नाहीं नयना. तुझें वाईट व्हावें असें मी कसें मनांत आणूं ? रंगा वांचावा म्हणून मी रामाला रोज आळवतें. परंतु दुखणें असाध्य. क्षय बहुधा.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel