''स्मशानांतच मृत्युंजय राहतो, कल्याण करणारा शिवशंकर राहतो, हालाहल पिणारा, जगाला वांचवणारा नीलकंठ राहतो.''

''काव्य पुरे.''

''तूं घरी जा. वादळ होणार आहे.''

''वादळ किती दिवस जीवनांत घों घों करित आहे. आतां या वादळांत जीवनाचें हें लहानसें घरटें उध्वस्त होवो हीच इच्छा.''

''ताई मी जातों.''

''मी येतें तुझ्याबरोबर.''

''माझ्या खोलींत चार मित्र. तेथें कोठें येणार तूं ?''

''तर मग माझ्या खोलींत चल.''

''मी चाललों.''

तिचा हात दूर करुन तो गेला. त्यानें मागें वळून पाहिलें नाहीं. ती तेथेंच उभी होती. वादळ घोंघावूं लागलें. मुसळधार पाऊस आला. ती तेथें उभी. ती पुढें पुढें कोठें जात आहे ? पाण्यांत शिरली. कडाड् कडाड् वीज गरजली. आणि कांही दिवे विझले. अंधार ! समोर लाटा हंसत होत्या. ये, तुला पोटात घेऊं, म्हणत होत्या. परंतु ती मागें गेली. पावसांतून भिजत चालली. डोळ्यांतून अश्रुधारा वहात होत्या. सभोंतीं वादळ, पाऊस, विजा; अंत:सृष्टींत तोच प्रकार. ती घरीं आली. तिनें लुगडें बदललें. तिनें केस पुसले, ट्रंकेंतील रंगाचा फोटो काढून तो हृदयाशीं धरुन ती पडली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel