समाजवाद म्हणजे धर्मशून्यता नव्हें. समाजवाद म्हणजेच खरा मानवधर्म. त्या चित्रांतून हें फार सुंदर दाखविण्यांत आलें होतें. आजच्या जीवनांतील रुढी, भेदाभेद, विषमता, अज्ञान, दारिद्र्य, उच्चनीच भाव, नाना प्रकार एका चित्रसंग्रहांत दाखवलेले; तर सर्वांना ज्ञान आहे, मानवधर्म आला आहे, सर्व निरोगी आहेत, आजारांत दवा मिळत आहे, ज्ञान-विज्ञान येत आहे, अशा अर्थाचीं चित्रें दुसर्‍या संग्रहांत. आणि मग प्रश्न विचारला होता कीं ''खरा धर्म आजच्या समाजरचनेंत आहे कीं समाजवादी रचनेंतच येईल ?''

रंगाला तें प्रदर्शन फार आवडलें. वासुकाका त्याला समाजवाद वगैरे सांगत असतच. परंतु आपली कला समाजवादाच्या निर्मितीसाठीं कारणीं लावतां येईल असा त्याला आत्मविश्वास वाटला. त्याला एक नवीन दृष्टि आली. जणुं एक नवीन दालन उघडलें, एक नवीन कप्पा उघडला.

सुटी होती. रंगा कधीं वर्गाला जाई, कधीं घरीं असे. लिली येऊन बसे. लिलीची आईहि कधीं कधीं रंगवित बसे.

''भाऊ, मला शिकव रे चित्रें काढायला.''
''ताई, एकदम कसें येईल ?''
''मी हळुहळू शिकेन. तूं माझें चित्र पुरें केलेंस ? कितीरे छान काढलें आहेस तूं.''

''भाऊबीजेच्या दिवशीं मी तें तुला ओंवाळणी म्हणून घालीन. तोपर्यंत तें माझ्या पेटींतच असूंदे. मधून मधून आणखी रंग भरीन, छाया दाखवीन. ताई, तुझी ती तसबीर मी तुला मढवून देईन. भाऊच्या हातची तसवीर. तूं ती भिंतीवर लाव. लिली बघत राहील. भाऊनें काढलेली आई असें म्हणेल.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel