ती एक गरीब विधवा होती. मोलाने काम करी व चार कच्च्या बच्च्यांचे पालनपोषण करी. एका लहानशा झोपडीत ती राहत असे. ती सदैव समाधानी असे. सकाळपासून सायंकाळपर्यंत एका क्षणाचाही विसावा तिला मिळत नसे. त्या दिवशी कोणता तरी सण आला होता. घरोघर आनंद होता.  प्रत्येकाच्या घरी आज कोणते ना कोणते तरी पक्वान्न करण्यात येत होते. रामाच्या घरी त्याच्या बापाने श्रीखंडासाठी चक्का आणला होता. मधुकरला बासुंदी आवडे म्हणून त्याच्या आईने कढईत दूध आटत ठेवले होते. गोविंदाच्या घरी पुरणपोळी होती. परंतु आमच्या त्या गरीब मोलकरणीच्या झोपडीत काय करण्यात येणार होते? त्या मोलकरणीने मोठ्या मिनवारीने दोन पैसे शिल्लक ठेवले होते. ती आज पुरणपोळी करणार होती. तिने एका परळात कणीक ठेवली होती. परंतु बाजारातून गूळ आणावयाचा होता. दुकानदार लहान मुलांना फसवतात, म्हणून ती गूळ आणण्यासाठी जाण्यास निघाली. ती आपल्या मुलांना म्हणाली, “येथे ही परळात कणीक आहे. मी ह्या घडवंचीवर ती ठेवून जाते. तुम्ही घरातच असा हो! दार उघडे टाकून बाहेर नका जाऊ; कोंबडा-कुत्री घरात शिरतील. मी लौकरच येते गूळ घेऊन. आज तुम्हाला गोड हवं ना. आज तुम्हाला पुरणाची पोळी करणार आहे.”

“पुरणाची पोळी? ओहो मजाच!” असे ती मुले आनंदाने टाळ्या वाजवून म्हणाली. त्यांची आई बाहेर गेली. मुले घरात बसली होती. इतक्यात त्यांच्या बोळातील मुले बाहेर आली व ती त्यांना हाका मारू लागली.

“अरे,  आज सणाचा दिवस. असे रे काय बसता चूलकोंबड्यासारखे? चला बाहेर खेळायला.” बाहेरची मुले हिणवू लागली. आग्रह करू लागली. शेवटी घरातील मुले बाहेर आली. आईने सांगितलेले ती विसरून गेली. मुलेच ती. खेळापुढे त्यांना कसली आठवण नि कसले काय! इतर मुलांबरोबर ती खेळावयास निघून गेली. झोपडीचे दार नीट लावून घेण्यास ती विसरली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel