बाबा विमान...झूम... असे म्हणत आदेश ची छोटी 'छबी' मोठ्या कुतूहलाने इकडे तिकडे पहात होती. आदेश त्याची पत्नी आणि त्यांचे छोटे बाळ नागपूर ला चालले होते. आदेश च्या माहेरी. मजा वाटली ना..हो  माहेरचं. जसे मुलींना हक्काचे माहेर असते तसे पुरुषांना कधीच  नसते. पण आदेश ला मात्र  होते. नागपूर ला त्याच्या 'माई' रहात होत्या. त्या माई म्हणजेच त्याचे माहेर होते. तसे आदेश ला जीवापाड जपणारे बाबा होते. डोळ्यात तेल घालून काळजी करणारी आई होती. पण माईंच्या रुपात मात्र त्याला अजून एक मायेचे छत्र गवसले होते. घरदारापासून दूर आपले भविष्य आखायला आलेल्या एका अनोळखी मुलाला माईंनी आपल्या प्रेमाने बांधून ठेवले होते.आणि आज आपल्या 'सोनपरी' ला त्यांना दाखवायला तो नागपूर ला चालला होता.

विमानात बसल्यावर आदेश ला आठवला त्याचा पहिला नागपूर प्रवास....

     पहिलीच नोकरी. स्वतःच्या गुणवत्तेवर मिळवलेली. आदेश खुश होता. बँकेत डायरेक्ट ऑफिसर  म्हणून नेमणूक झाली होती. पण पोस्टिंग नागपूर ला. आदेश ला वाटले बाबा म्हणतील नको  एवढ्या लांब रे .नोकऱ्या काय ढीगभर मिळतील . आई तर शक्यच नाही  मला एवढया दूर पाठवणं.  आदेश ने कॉल लेटर देवापुढे ठेवले. घरी येईपर्यंत अख्ख्या बिल्डिंग ला आणि फॅमिली कट्ट्याला बातमी पोचली होती.

पण..पण आई एवढ्या लांब... मी  एकटा कसा राहू. मला सवय नाहीय ना. बाबांनी पाठीवर हात ठेवला अरे होईल सवय . इतका चांगला जॉब कशाला हातचा जाऊ द्यायचा आणि ट्रान्सफर मिळेलच की. अजून संसाराची जबाबदारी नाही तो पर्यंत जा. नोकरीच्या निमित्ताने फिरून घे. आई ने देखील बाबांनीच री ओढली. आता आदेश ला जर धीर आला होता. आत्ता पर्यंत कधी घर सोडून इतक्या लांब गेला नव्हता. पण चांगल्या नोकरी चे आमिष त्याला नागपूर ला खुणावत होते. शिवाय त्याला स्वतःच्या स्वभाव बद्दल आत्मविश्वास होता. आपण आपल्या गोड व लाघवी स्वभावाने सगळ्यांची मने जिंकू

याची त्याला खात्री होती. सगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण करत जायचा दिवस उजाडला. एक अनामिक हुरहूर त्याला दाटून आली. पोटात खड्डा पडल्या सारखे झाले. शक्य तितक्या लवकर आपण मुंबई ला परत यायचे हा निश्चय करूनच  तो निघाला.

   नागपूर चे वातावरण .. लोकांची बोलीभाषा यात तो सहज रुळून गेला. बँकेत आपल्या मधाळ बोलण्याने अनेक नागपुरी ग्राहक आपल्याकडे मोठ्या चातुर्याने वळवून घेतले . पण जमेना ते तिथले जेवण. तिथले तिखट चमचमीत जेवण त्याच्या पचनी पडेना. त्याची जेवणाची आबाळ होऊ लागली. पोटाचे आजार होऊ लागले . सतत आई च्या हाताचे साधे हलके फुलके जेवण आठवू लागले. आई ला फोन करून तो जेवणाच्या तक्रारी करू लागला . सुट्टी मिळताच मुंबई ला घरी पळू लागला.  एकदा आई बाबांनी निक्षून सांगितले असे सारखे सारखे येणे बरे नाही . तुझा फावला वेळ सगळा प्रवासात आणि  कमावलेला पैसा सगळा प्रवास खर्चात जातोय. थोडे ऍडजस्ट करायची सवय कर. किती दिवस आई च्या पदराखाली रहाणार आहेस. आई बाबांचे म्हणणे व्यवहाराला धरूनच होते. आदेश काय ते उमगला. थोडे फार आई च्या सांगण्या प्रमाणे घरीच जेवण बनवण्याचा असफल प्रयत्न करू लागला. बापरे.... कस्टमर पटवण्यापेक्षा अवघड काम होते पोटासाठी अन्न शिजवणे.

       त्या दिवशी 'माई' बँकेत आल्या होत्या. बँकेच्या सर्वात जुन्या कस्टमर . आदेश ने नागपूर ब्रँच चा चार्ज घेतल्या पासून तो त्यांना भेटला  नव्हता कारण त्या आपल्या लेकीकडे अमेरिकेत गेल्या होत्या सहा महिन्यांसाठी. सगळ्या स्टाफ साठी स्वीटस घेऊन आल्या होत्या. शिवाय त्यांच्या हाताची स्पेशल सांबार वडी.. अगदी अस्सल नागपूरी. चमचमीत,चविष्ट पण तिखट.

आदेश नेहमी प्रमाणेच खाऊ शकला नाही. सगळा स्टाफ माईंभोवती गोळा होऊन त्यांची चौकशी करत होता. माई पण प्रत्त्येकाची आपुलकी ने विचारपूस करत होत्या. माणसे जोडणे हा त्यांचा छंद तर होताच पण विरंगुळा पण होता. आदेश नेमका कस्टमर मध्ये गुंतला असल्याने त्याला जास्त बोलता आले नाही. पण रूम वर गेल्यावर राहून राहून त्याला त्या माई आठवत राहिल्या.

नंतर तो त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी मुंबईत आला. ट्रान्सफर साठी जाऊन हेड ऑफिस ला बोलून देखील आला.

     एके दिवशी आदेशला सरांनी माईंच्या घरी जायला सांगितले काही सह्या घेण्यासाठी..थोड्या नाखुषीनेच आदेश माईंच्या घरी गेला. माईंनी दार उघडले, आजारी दिसतच होत्या. आदेश ने त्यांच्या सह्या घेतल्या. त्यांची विचारपूस करून निघाला तेवढ्यात माईंना चक्कर आली.आदेश ला काय करावे ते सुचेना. त्याने पटकन त्यांना धरले व सोफ्यावर झोपवले.किचन मधून पाणी आणून पाजले, थोड्यावेळात त्या सावध झाल्या. घरी कोणी नाही का त्याने विचारले,तेंव्हा त्याला कळले की त्या एकट्याच रहातात, त्यांचे पती  वर्षांपूर्वीच निर्वतले. मुलगी अमेरिकेत असते. पण आपला देश सोडून कायम चे परमुलखात रहाणे  त्यांच्या पचनी पडत नव्हते.आदेश ने सहज निरीक्षण केले..नीटनेटके घर, घरातील शोभेच्या वस्तू माईंची उच्च अभिरुची, चोखंदळपणा आणि निरनिराळे देश फिरून आल्याची साक्ष देत होते. माईंचे शेजारी त्यांची काळजी घ्यायला आल्यावर आदेश परत बँकेत आला.

काही दिवसात माई परत नेहमी सारख्या हिंडू फिरू लागल्या. आज माईंनी खास त्याच्या साठी सांबार वडी आणली होती . आदेश ने नम्र पणे नाही म्हणताच त्या म्हणाल्या अरे खा खास तुझ्यासाठी कमी तिखट केली आहे. त्या दिवशी तिखट असल्यामुळे आदेश खाऊ शकला नव्हता हे त्यांच्या चाणाक्ष नजरेने ओळखले होते.अशाच होत्या त्या मनकवड्या. काही दिवसातच आदेश ची आणि माईंची चांगली गट्टी झाली. बऱ्याचदा आदेश बँकेतून सुटल्यावर किंवा सुट्टी च्या दिवशी माईंकडे जात असे. त्यांच्या हातच्या सुग्रास भोजनासह त्यांच्या गप्पात तो गुंतत गेला. तासंतास आदेश माईंकडे असायचा,आपले भविष्यातील प्लॅन , घरच्यांच्या आठवणी, आपले कॉलेज चे दिवस, केलेल्या  नाटकांच्या तालमी, सादर केलेले प्रयोग सारे तो माईंपाशी बोलायचा.माई देखील गुणग्राहक होत्या. नाट्य क्षेत्राबद्दल त्यांच्या मनात अतिशय आपुलकी होती. आदेश चा पाहिले आपल्या पायावर उभे राहण्याचा मगच कला क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय त्यांना मनापासून पटला होता. एके काळी त्या देखील कलेच्या क्षेत्रात आपले नाव होण्यासाठी धडपडत होत्या. त्यांचे अनुभवाचे बोल त्याला खूपच समृद्ध करत. त्याने इथून जाऊ नये असेच त्यांना वाटे,पण परत मुंबई ला आपल्या घरी जायला आसुसलेल्या या लेकराला त्या आपल्या मायेच्या छत्राखाली धरत.  त्याच्या किरकोळ आजारपणात त्याची काळजी घेत. आई ची उणीव भासू नये या साठी प्रयत्न करत. जगाचे भले बुरे अनुभव सांगत व जगण्याचे धडे देत. आर्थिक नियोजन करण्यात त्या आदेश च्या प्रमुख सल्लागारच होत्या जणू.

     अशातच एक दिवस आला आदेश च्या व त्याच्या आईच्या प्रयत्नांना यश आले.

आदेश मुंबई ला वरच्या पोस्ट वर ट्रान्सफर होऊन आला. परत घरी जाण्यासाठी उतावीळ असलेला आदेश माईंचा निरोप घेताना मात्र हळवा झाला.असाच होता तो जाईल तिथे आपला ठसा उमटवणारा. लाघवी. पण माईंनी खूप खंबीर मनाने निरोप दिला व आता येशील ते जोडीनेच भेटायला ये असा आशीर्वाद दिला.

त्यांचा मनापासून मिळालेला आशीर्वाद

फळाला आला.मुंबई ला आल्यावर

लवकरच एक 'स्वप्नातली परी' त्याच्या आयुष्यात आली . माई सुद्धा त्याला आशीर्वाद द्यायला मुंबई मध्ये आल्या होत्या. आदेश ला खुश पाहून आनंदून गेल्या. कार्यात सार्यांना घरचे सख्खे माणूस वाटावे इतक्या त्या मिसळून गेल्या होत्या.वधूवरांना नागपूर ला आग्रहाने येण्याचे निमंत्रण देऊन गेल्या.

त्यांच्या आग्रहाने काही महिन्यातच आदेश जोडीने नागपूर ला गेला. आदेश ची बायको देखील माईंच्या गोड स्वभावावर फिदा झाली.आदेश च्या लाडिक तक्रारी आणि सुखी संसाराच्या मौलिक सल्ल्यांची भेट घेऊन ते परत मुंबईत आले. माईंच्या विशाल हृदयात व कुटुंबात आता तिला  ही स्थान मिळाले होते.

          दिवस पटापट जात होते. दोघांच्या संसारात 'गोड'बातमी होती. माईंनी खुश होऊन बाळंत विडा करायला घेतला होता. दिवस भरत आले होते बायको ला सोडून आदेश कुठेही जात नव्हता. माईंच्या बरोबर शेअर केलेली स्वप्ने आता खरी होऊ लागली होती.

       आणि एक दिवस त्याला फोन आला आणि आदेश मागचा पुढचा विचार न करता मिळेल त्या फ्लाईट ने नागपूर ला पोचला. माई पुन्हा आजारी पडल्या होत्या. दोन दिवस तो त्यांच्या पासून हलला नव्हता. तिसऱ्या दिवशी माईना शुद्ध आली. आदेश ला जवळ पाहून  रागावल्या आत्ता तू बायको जवळ हवास असे म्हणाल्या. पण मी बायको ची परवानगी घेऊनच आलोय असे म्हणताच थोड्या सुखावल्या. पण आता मी बरी आहे आणि त्यांची अमेरिकेतील मुलगी यायला निघाली आहे तेंव्हा आता तू माझी नाही तुझ्या बायकोची काळजी घे असे सांगून त्याला घरी पाठवले.

आदेश ने तो 'बाबा' झाल्याचे फोन वरून कळवताच आनंदून गेल्या. पण आत्ता तुम्ही धावपळ करू नका मी बाळ थोडे मोठे झाले की स्वतः घेऊन येईन असे प्रेमळ आश्वासन दिले होते. अंतर फक्त शहरांचे होते. मनाचे कधीच नव्हते. आणि आज तो आपल्या बाळाला घेऊन माईंच्या घरी चालला होता.

      विमानाने लँड केले आणि आदेश च्या विचारांनी देखील.

एक अनोखे नाते ,आगळावेगळा बंध. अशीच असतात काही नाती ज्याला काही मर्यादा किंवा वयाचे बंधन नसते. हे बंध आदेश च्या संस्कारांचे होते. आई बाबांनी दिलेल्या शिकवणूकीचे होते. न कळत जुळलेले  ऋणानुबंध होते. आदेश नकळत यात गुंतला होता.  यात कुठला ही स्वार्थ नव्हता की संधीसाधू पणा नव्हता. होते ते केवळ निर्व्याज, निखळ प्रेम. होता तो आदर आणि आपुलकी. 'वसूधैव कुटुंबकम' अशा माईंच्या विशाल कुटुंबात त्याच्या 'सोनपरी' ला सुद्धा दाखल करण्यास  आता आदेश उतावळा झाला होता. तेच संस्कार तीच शिकवण घेऊन त्याची लेक सुद्धा माणूसपण जोडण्यासाठी उंच आकाशात भरारी घेऊन येत होती.

© मंजू काणे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel