लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला ।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मल वाहे झुळझुळां ।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।१।।

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभूतीचे उधळण शीत कंठ निळां
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।२।।

देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें ।
त्यामाजी अवचित हलाहल जें उठिलें ।
ते त्वां असुरपणे प्रशान केलें ।
नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ||
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।३।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदास अंतरीं ।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।४।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel