१९९० च्या दशकात जेव्हा हिंदी चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी नव्हती, त्यावेळेस डेरा बुगटी येथे ‘तिरंगा’ हा चित्रपट एका चित्रपटगृहात लागला होता. त्यात नाना पाटेकरांनी एका मराठी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. या चित्रपटात जेव्हा नाना पाटेकर ‘मैं मराठा हूँ. और मराठा मारता हैं या मरता हैं’ हा संवाद म्हणतात, त्यावेळी चित्रपटगृहातील या मराठा प्रेक्षकांनी हर्षांने शिट्टय़ा वाजवत एकच गोंधळ घातला होता. त्यामुळे या समाजाला स्वत:च्या मराठीपणाचा निश्चितच अभिमान आहे हे दिसून येते. बऱ्याच बुगटी मराठा बांधवांनी ‘द ग्रेट मराठा’ ही िहदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून बघितली. बलुची कलाक्षेत्रातही या मराठा समाजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ‘बेबी डॉल’ हे प्रसिद्ध िहदी गीत ज्या बलुची गाण्यावर आधारित आहे, त्या गाण्याचे गायक सब्ज अली बुगटी हे मराठाच आहेत. सब्ज अली बुगटींचे मूळ बलुची गाणे यू-टय़ूबवर ऐकता येऊ शकते. जुन्या काळातील प्रसिद्ध बलुची गाणे ‘लवानी लला’ हे गीत गाणारे जाहरो बुगटी हेदेखील मराठाच होते. डम्बुरा या बलुची वाद्यावर बऱ्याच मराठा कलाकारांची चांगलीच हुकूमत आहे. मात्र आज बुगटी मराठा समाज बुगटी जमातीमध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे.