आता ऐका माझे वचन । मनाने व्हावे रामर्पण ॥ माझे नातेगोते एक राम । हा भाव ठेवून जावे रामास शरण ॥ अनन्य व्हावे भगवंती । जो कृपेची साक्षात मूर्ति ॥ रामा आता करणे नाही उरले जाण । तुला आलो मी अनन्य शरण ॥ सुखदु :खाचा दाता । सत्य नाही दुजा आता ॥ जाणिवेने जैसे घ्यावे । तैसे मनाने सुखदु :ख भोगावे ॥ मी -माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण । तोपर्यंत नाही समाधान ॥ सर्वस्वी राहावे रामास अर्पण । हाच उपाय सांगती साधुजन ॥ रामाला अर्पण व्हावे कोण्या रीती । त्याचा मार्ग सज्जन सांगती ॥ प्रयत्नेविण राहो नये । फळाची आशा ठेवू नये । भगवंताला विसरु नये । कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे ॥ प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान । तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम ॥ अखंड राखावे अनुसंधान । येणे कर्म होईल सहज रामार्पण ॥

वृत्ति राखावी अत्यंत शांत । हेच संताचे मुख्य लक्षण जाण ॥ जे जे घडेल काही । ते ते रामइच्छेने पाही ॥ असा करावा संसार । परि असावे खबरदार ॥ त्राता राम जाणुनी चित्ती । निर्भय करावी आपली वृत्ति ॥ थोर भाग्य उदया आले । रामराय घरी आले । आता व्हावे रामाचे आपण । व्यवहार प्रपंच करावा जतन ॥ न दुज्याचा दोष पाहावा । त्याचा आपणापाशीच ठेवा ॥ देह आहे परतंत्र । मन राखावे भगवंताशी स्वतंत्र ॥ मनाने जो बांधला । परतंत्र वाटेल त्याला ॥ शरण गेला रामचरणी । त्याला नाही दुजी हानि ॥ अखंड करावे नामस्मरण । नीतिधर्माचे असावे आचरण ॥ बायकोमुले , लहान थोर । यांनी न सोडावा रघुवीर ॥ काळ फार कठीण आला । बुध्दिभेद त्वरित झाला ॥ आता सांभाळावे सर्वांनी आपण । रामाविण न जाऊ द्यावा क्षण ॥ चालले तसेच चालावे । राम ठेवील तसे असावे ॥ माझा राम जोडला हे जाणले ज्याने । त्याला न उरले करणे ॥ राम ठेवील ज्या स्थितीत । त्यात समाधान मानावे ॥ रामास जे करणे असेल । ते तो करील ॥ सदा सर्वकाळ माझ्याशी वास । हाच धरावा हव्यास ॥ त्याला न जावे लागे कोठे । घरबसल्या राम भेटे ॥ जो करी रामपदांबुजचिंतन । तयास नाही यमाचे बंधन ॥ संताची सेवा केली । महदभाग्य घरी आले ॥ एका परमात्म्याशिवाय नाही कोणास शरण ॥ तोच खरा धन्य धन्य ॥ संताचे मर्जीने वागल्यास । कल्याण होईल खास ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel