विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का? विषय सोडल्याशिवाय ' मी भक्ती करतो ' असे म्हणणे चुकीचे आहे. विषय आहेत तिथे भक्ती नाही, आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत. भक्त म्हणजे भगवंताचे होऊन राहणे. त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही. अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही. प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल ते पाहावे, आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा. आपण प्रपंचात ' मी करीन तसे होईल ' या भावनेने वागत असतो. परवाच एकजण आले होते, त्यांना त्या वेळी पाहून कोणीही म्हटले असते की, हे थोड्याच दिवसांचे सोबती आहेत. तरीही " मी अमुक करीन, तमुक करीन, " असे ते म्हणतच होते; आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान! म्हणून सांगतो की, ' मी करतो ' ही भावना टाकून देऊन, सर्व काही तोच करत आहे, आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो, ही भावना ठेवून वागावे. त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते. ' मी कर्ता आहे ' ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्यच नाही.

कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक फळ मिळेल म्हणून वेदांत सांगितले आहे, त्यावरून वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काहीजण म्हणतात. पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवतात त्याप्रमाणे ते आहे. माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म अरायला लागावे. तोकर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते; आणि पुढे अभिमान जाऊन, मी कर्ता नसून तोच करवीत आहे असे वाटू लागते. मग तो जे कर्म करील ते देवाला आपोआपच अर्पण होते. संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो, देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे ' देवात अर्थ नाही ' असे म्हणतो. पण देवाला फसविणे शक्य आहे का? तो म्हणतो, " हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता, आणि आता आठवण करतो आहे! " वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे? म्हणून देवाला फसवू नये; कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते. आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाडकष्ट करतो, परंतु दिवसातून एखादा तरी तास देवासाठी खर्च करतो का हे आपल्याशीच विचार करून पाहावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel