नाम हे सच्चिदानंद-स्वरुप आहे. शुध्द परमात्मस्वरुपाच्या अगदी अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच होय. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रुपे घडविणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, पण आपण स्वत: मात्र मूळ स्वरुपाने राहणे, ही केवढी विलक्षण लीला आहे ! खरोखर, तुम्हाला मी काय सांगू ! बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे, अजून नामाचे माहात्म्य संपत नाही. नामाचे माहात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे. जो नामात ‘ मी ’ पणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या माहात्म्याची कल्पना आली. असा पुरुष नामाविषयीं मौन तरी धरील, कारण त्याचे माहात्म्य कोणालाच सांगता येणार नाही; किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे माहात्म्यच सांगत राहील, कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही, आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही. नामाने सर्व पापे नाहीशी होतात. भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते.

नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे. कसे ते पहा. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास करणे जरुर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. दुसरे, वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, पण नाम कुणीही घ्यावे. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ॐकरानेच होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते; पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती, वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुध्दी होण्यासाठीच तिथे जाणे जरुर आहे. नाम हे सर्व सत्कर्माचा राजा आहे. सत म्हणजे भगवंत, त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म. इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात, नाम हे साक्षात भगवंताकडे पोहोचवते. नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयांची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सर्व दु:खे नाहीशी होतात, कारण या दु:खांचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे, आणि नामाने ती आपोआप सुटते, म्हणून दु:ख नाहीसे होते. शिवाय, भगवंत हा आनंदरुप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दु:ख त्या ठिकाणी कसे राहू शकेल?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel