कपि विर उठला तो केग अद्‍भूत केला । त्रिभुवनजनलोकीं कीर्तिचा घोष केला ॥ रघुपति उपकारें दाटलें थोर भावें । परम विर उदारें रक्षिले सौख्यकारें ॥१॥
सबळ दळ मिळालें युद्ध ऊदंड झालें । कपिकटक निमाले पाहतां येश गेले । परदळ शरघातें कोटिच्या कोटि प्रेतें । अभिनव रणपातें दु:ख बीभीषणातें ॥२॥
कपिरिसघनदाटी जाहली थोर आटी । म्हणउनि जगजेठी धांवणें चार कोटी । स्मृतिविरहित ठेले मोकळे सिद्ध झाले । सकळ जनु निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥३॥
बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणनाथा । उठवि मज अनाथा दूर सांडूनि वेथा । झडकरिं भिमराया तूं करी दृढ काया । रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ॥४॥
तुजविण मज पाहे पाहतां कोण आहे ॥ म्हणउनि मन माझें रे तुझी वाट पाहे । मज तुज विरवीलें पाहिलें आठवीलें ।
सकळिक निजदासालगि सांभाळवीलें ॥५॥
उचित हित करावें उद्धरावें धरावें । अनहित न करावें त्वां जनीं येश घ्यावें । अघटित घडवावें सेवका सोडवावें । हरिभजन घडावें दु:ख तें बीघडावें ॥६॥
प्रभुवर विरराया जाहली दृढ काया । परदळ निवटाया दैत्यकूळें कुटाया ॥ गिरिवर उगटाया रम्यवेषें नटाया । तुजचि अलगटाया ठेविलें मुख्य ठाया ॥७॥
बहुत सबळ सांठा मागतो अल्प वांटा । न करित हित कांठा थोर होईल ताठा ॥ कृपणपण नसावें भव्य लोकीं दिसावेम ।
अनुदिन करुणेच चिन्ह पोटीं वसावें ॥८॥
जळधर करुणेचा अंतरामाजिं राहें । तरि तुज करुणा हे कां नये सांग पां हे । कठिण हदय झालें काम कारुण्य गेलें ।
न पवसि मज कां रे म्यां तुझें काय केलें ॥९॥
वडिलपण करावें सेवका सांवरावें । अनहित न करावें तूर्त हातीं धरावें ॥ निपटचि हटवावें प्रार्थिला शब्दभेदें । कपि घन करुणेचा वोळला रामवेधें ॥१०॥
बहुतचि करुणा या लोटली देवराया । सहजचि कपिकेतें जाहली दृढ काया ॥ परम सुस्त्र विलासे सर्वदा सानुदासें । पवनतनुज तोषें वंदिले सावकाशें ॥११॥

॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel