१९५

कृष्णा कैशी खेळूं लपंडाई । अनंत लोचन तुझे पाही । तेथें लपावें कवणे ठायीं । तुझें देखणे लागलें पाहीं ॥१॥

कान्होबा पाववी आपुल्या खुणा ॥धृ॥

लपुं ममतेच्या पोटीं । जेथेंतेथें तुझीच दृष्टी । तेथें लपायाची काय गोष्टी । तुझे देखणें लागलें पाठीं ॥२॥

लपुं गिरीं कपाटीं कडवसा । जेथें तेथें तुझाचि ठसा । एका जनार्दनी सरिसा । तेणें मोडली खेळायाची आशा ॥३॥

१९६

उघड जगीं दिसोनियां कां झांकितीसी डोळां । पाहतां पाहतां खेळामध्ये वरपडा होसी काळा ॥१॥

नको खेळूं लंपडाई नको खेळूं लपडाई । मिळाले ते गडी जाती पळुनि पडाल दांत विचकुन भाई ॥२॥

उगाचि डोळे झांकुनि कांरे होसी अंध । संसारमायामोह याचा टाकी बा छंद ॥३॥

शरण एका जनार्दनीं जातां चुके हा खेळ । नाहीं तरी पडसी गुतोंनि कोण करील कळवळ ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel