कृपाळु सज्जन तुम्ही सन्तजन । हेंचि कृपादान तुमचें मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुळती ॥२॥
अनाथ अपराधी पतित आगळा । परि पाया वेगळा नका करुं ॥३॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी । मग मजहरी उपेक्षिना ॥४॥
*
सन्ताचिया पायीं हा मझा विश्‍वास । सर्वभावें दास झालों त्यांचा ॥१॥
तेचि माझें हित करिती सकळ । जेणॆं हा गोपाळ कृपा करी ॥२॥
भागलिया मज वाहतील कडे । त्यांचियानें जोडे सर्व सुख ॥३॥
तुका म्हणे शेष घेईन आवडी । वचन न मोडी बोलिलें तें ॥४॥
*
लेकुंराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥
ऎसी कळवळ्याची जाती । करी लाभाविणा प्रीती ॥२॥
पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्वही साहे ॥३॥
तुका म्हणे माझें तुम्हां सन्तावरी ओझे ॥४॥
*
शेवटींची विनवणी । सन्तजनीं परिसावी ॥१॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥२॥
आतां फ़ार बोलों कायी । अवघे पायीं विदित ॥३॥
तुका म्हणॆ पडिलो पाया । करा छाया कपेची ॥४॥
*
पायाच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥१॥
मज क्षमा करणें सन्ती । नव्हे अंगभूत युक्ति ॥२॥
नव्हे हा उपदेश । तुमचे बडबडिलों शेष ॥३॥
तुमचें कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका म्हणॆ ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel