श्रीगणेशाय नमः ॥

जो परमात्मा शेषशायी ॥ जो क्षीरसिंधूचा जांवई ॥ तो राखितो गोकुळीं गाई ॥ गौळियांच्या सर्वदा ॥१॥
ज्यासी नाम रुप गुण नाहीं ॥ निर्विकार व्यापक सर्वांठायी ॥ तो नंदाराणीस म्हणे आई ॥ मज घेईं कडेवरी ॥२॥
जो नाना साधनीं न साधे ॥ त्यासी यशोदा दाव्यानें बांधे ॥ ज्याच्या कृपेनें ब्रह्मांड बोधे ॥ तो गौळियांचे छंदें नाचतसे ॥३॥
व्यासवाल्मीकादि कवी ॥ वर्णिती ज्यासी सदा पदवी ॥ तो गौळियांसांगातें जेवी ॥ थोरपण टाकूनियां ॥४॥
तोचि हा पंढरींत भीमातीरीं ॥ ब्रह्मानंद लीलावतारी ॥ समपद जोडोनियां विटेवरी ॥ वाट पाहात भक्तांची ॥५॥
बारावा अध्याय संपतां ॥ काय वर्तली तेथें कथा ॥ अकरा सहस्त्र कंसदूतां ॥ त्रासवूनि गेले गंधर्व ॥६॥
याउपरी एके दिनीं ॥ यमानुजांतीरीं कैवल्यदानी ॥ अनंत गोपाळ मिळोनी ॥ खेळ मांडिला तेधवां ॥७॥
ठायीं ठायीं वृंद गोपाळांचे ॥ खेळ खेळती नाना परींचे ॥ नाना कष्ट साधनांचे ॥ तपें तीव्र आचरती ॥८॥
हरीसी सांडूनि एकीकडे ॥ ठायीं ठायीं मांडिलीं बंडें ॥ नाना मतें साधनकाबाडें ॥ नेणोनि हरीसी शोधिती ॥९॥
एकीं वादप्रतिपाद केला ॥ हमामा घालितां जन्म गेला ॥ एकीं हुतुतू खेळ मांडिला ॥ अहंकृति जाणोनियां ॥१०॥
एकांनीं भेदाची हमली ॥ घालितां तीं बहु श्रमलीं ॥ अहंममतेची चेंडूफळी ॥ एक भ्रमणचक्रें खेळती ॥११॥
काळविवंचना करिती पाहीं ॥ हेचि एक खेळती लपंडाई ॥ एकीं वायुधारणाबळें पाहीं ॥ केली वावडी शरीराची ॥१२॥
तीर्थभ्रमणाचा भोंवरा ॥ घेवोनि खेळती एकसरां ॥ एक जन्ममृत्युयेरझारा ॥ विटीदांडू खेळती ॥१३॥
सिद्धींचे साधनें सुरवाडती ॥ कडेकपाटें एक शोधिती ॥ परी हरिरुपीं न मिळती ॥ अहंममते भूलोनियां ॥१४॥
ऐसे बहुत गुंतले खेळीं ॥ दुरुनि पाहे वनामाळी ॥ तों त्यांच्या गाई सकळी ॥ रानोमाळ चौताळंती ॥१५॥
दश इंद्रियें मनोवृत्ती ॥ खडाणा गाई न वळती ॥ गोपांसी म्हणे जगत्पती ॥ गाई आधीं सांभाळा रे ॥१६॥
गाई वळूनि स्थिर करा ॥ मग खेळ तुमचा अवघा बरा ॥ ऐसें बोलतां जगदुद्धारा ॥ गोप धांवती वळावया ॥१७॥
करणांचिया नाना वृत्ती ॥ दुरील गाई नाटोपती ॥ विषयतृण देखती ॥ तों तों धांवती पुढें पुढें ॥१८॥
आडमार्गें गाई धांवती ॥ नाना कडेकपाटीं रिघती ॥ तृष्णेच्या खळग्यामाजी पडती ॥ कदा न सरती माघारां ॥१९॥
वासनेच्या जाळ्या थोर ॥ त्यांत तोंडें घालिती वारंवार ॥ तेथें कामक्रोधादि किरडें अपार ॥ कडकडोनि डंखिती ॥२०॥
द्वेष गर्व मद मत्सर ॥ हेचि सावजें भयंकर ॥ विकल्पगुल्में अतिघोर ॥ निर्गम नोहेचि तेथोनि ॥२१॥
निंदेचे ओरबडती कांटे ॥ नाना कुतर्क आडफांटे ॥ त्रिविध तापाचे चपेटे ॥ भयंकर वणवाहा ॥२२॥
ऐशा गाई विषयतृण चरती ॥ परी सर्वथा नव्हे तृप्ती ॥ मग स्वर्गसुखाच्या पर्वतीं ॥ ऊर्ध्वगती चढियेल्या ॥२३॥
सुकृताचे तृण सरे ॥ मग फिरतां न ये माघारें ॥ लोटूनि देती एकसरें ॥ दुःखभारें आरडती ॥२४॥
जैसें भाडियाचें घोडें देख ॥ कीं वेश्येची मैत्री क्षण एक ॥ कीं उशीं घेतला दंदशूक ॥ बहु शीतल म्हणोनियां ॥२५॥
विषाचें शीतळपण ॥ कीं ओडंबरीचें भूषण ॥ कीं गंधर्वनगरींचें सैन्य ॥ तैसें जाण स्वर्गंसुख ॥२६॥
असो गाई गेल्या सकळ ॥ बहिर्मुख अवघे गोपाळ ॥ मग धांवती रानोमाळ ॥ गोगवेषणाकारणें ॥२७॥
गाई नाटोपती सर्वथा ॥ शिणले गोपाळ धांवतां ॥ इंद्रियें निग्रह करुं जातां ॥ तों तीं अधिक खवळती ॥२८॥
नेत्र भलतेंचि विलोकिती ॥ म्हणोनि झांकिले अहोरात्रीं ॥ तों कर्ण नसतेंचि ऐकती ॥ कैसीं आकळती इंद्रियें ॥२९॥
जिव्हां आठवी रस ॥ घ्राण मागे सुवास ॥ त्वचा मागे स्पर्श ॥ थोर उत्कर्ष इंद्रियांचा ॥३०॥
मन इंद्रियांचा धनी ॥ एकादश स्वर्ग त्यापासूनी ॥ त्या मानसी ठायीं वळोनी ॥ हरीविण कोणा नाणवे ॥३१॥
मन हें व्याघ्र भयंकर ॥ दश इंद्रियें त्याची पिलीं साचार ॥ जिकडे उडी घेई मनोव्याघ्र ॥ पिलीं समग्र तिकडेचि ॥३२॥
या मनोव्याघ्रें थोर थोर ॥ गिळिले पुन्हां दुजे गिळणार ॥ भगांकित केला पुरंदर ॥ कलंकी चंद्र जाहला ॥३३॥
असो बहुतांचीं नांवें घेतां ॥ निंदा घडो पाहे तत्त्वतां ॥ गोपाळ शिणले बहु धांवतां ॥ गाई सर्वथा नाटोपती ॥३४॥
ऐसे गोपाळ बहु श्रमले ॥ म्हणती काय करावें ये वेळे ॥ धरा जगंद्वद्याची पाउलें ॥ तरी आकळे गोवृंद ॥३५॥
मग सकळ गोपाळ त्या अवसरा ॥ शरण आले इंदिरावरा ॥ म्हणती तुजवांचून मुरहरा ॥ गाई कदा नाकळती ॥३६॥
तुजवेगळीं बंडें ॥ केलीं आम्हीं उदंडें ॥ बहुत साधनें प्रचंडें ॥ करोनियां शीणलों ॥३७॥
हरि तुझी कृपा न होतां ॥ अवघीं साधनें गेलीं वृथा ॥ आतां उठें तूं अच्युता ॥ वळीं गाई आमुच्या ॥३८॥
ऐसें गडी सहज बोलती ॥ कृपारस दाटला हरीच्या चित्तीं ॥ वंशवाद्य घेऊनि हातीं ॥ कमलापति उठला ॥३९॥
मुरलीधरें ते अवसरीं ॥ मुरली लाविली अधरीं ॥ मुरलीनादें मुरारी ॥ मन मोहवी गाईंचें ॥४०॥
ऐकतां मुरलीचा स्वर ॥ गाई टंवकारल्या समग्र ॥ धांवत आल्या सत्वर ॥ सर्व विषय टाकूनियां ॥४१॥
हरीभोंवती हंबरती ॥ एकी प्रीतीनें चरण चाटिती ॥ पुच्छें वर करुनि नाचती ॥ गोप पाहती विस्मित ॥४२॥
गोप म्हणती घननीळा ॥ धन्य तुझी अगाध लीला ॥ क्षणमात्रें गाई सकळा ॥ तुवां वळविल्या मुरलीस्वरें ॥४३॥
कृष्णपायीं घालिती मिठी ॥ प्रेमें सद्गद होती पोटीं ॥ म्हणती धन्य भाग्य आमुचें सृष्टीं ॥ गडी जगजेठी जोडला ॥४४॥
कळंबातळीं घननीळ ॥ पांवा वाजती रसाळ ॥ सभोंवते मिळोनि गोपाळ ॥ गदारोळ करिताती ॥४५॥
पेंधा म्हणे ऐका गोष्टी ॥ पूर्वीं खेळे बहुत जाहले सृष्टीं ॥ आम्ही जाहलों तेचि पुढती ॥ खेळ देखा सर्वही ॥४६॥
गडी म्हणती पेंधिया ॥ ते कोण सांगें लवलाह्या ॥ पेंधा म्हणे चित्त देऊनियाम ॥ सावध ऐका सकळही ॥४७॥
पूर्वीं नीलग्रीवसुत षडानन ॥ संसार मिथ्यारुप जाणोन ॥ कपाटीं बैसला जाऊन ॥ स्वस्वरुप चिंतित ॥४८॥
विधिपुत्र नारद जाणा ॥ तो कळी लावावया बहु शाहणा ॥ परस्परें लावूनि भांडणा ॥ आपण कौतुक पाहतसे ॥४९॥
व्यासपुत्र शुक आगळा ॥ तेणें काम सगळाचि गिळिला ॥ रंभेचा गर्व हरिला ॥ निजप्रतापेंकरुनियां ॥५०॥
अंबरीप ध्रुव रुक्मांगद ॥ शिबी हरिश्चंद्र प्रसिद्ध ॥ खेळ्यांमाजी मुकुटमणी प्रल्हाद ॥ ज्याची लीला अगाध पैं ॥५१॥
खेळ्यांमाजी बळिया बळी ॥ द्वारपाळ ज्याचा वनमाळी ॥ बिभीषण तो राक्षसमेळीं ॥ कुलोद्धारक निवडला ॥५२॥
हनुमंत वायुनंदन ॥ खेळ्यांमाजी पंचानन ॥ तो श्रीरामासी आवडे जैसा प्राण ॥ गिरि द्रोण जेणें आणिला ॥५३॥
ऐसे खेळे बहुत आहेत ॥ परी म्यां सांगितले किंचित ॥ ऐसें गोप जों संवादत ॥ तों सायंकाळ ओसरला ॥५४॥
अस्तासी गेला वासरमणी ॥ गोकुळा परतला चक्रपाणी ॥ आपल्या गाईंलागोनी ॥ गोप बाहती तेधवां ॥५५॥
ये गे चक्रधरे मीनरुपें ॥ शंखासुर मारिला प्रतापें ॥ पान्हाइलीस ऐक्यरुप ॥ विधीलागीं डोळसे ॥५६॥
एक गाई निबरपृष्ठी ॥ भक्त पाळी कृपादृष्टीं ॥ एक म्हणे माझे गाईनें सकळ सृष्टी ॥ दंतांवरी धरियेली ॥५७॥
एक म्हणे माझी गाई सिंहवदन ॥ परी भक्तांसी सदा सुप्रसन्न ॥ एक म्हणे माझी खुजी वामन ॥ थोर तरी गगनीं न समाये ॥५८॥
एक म्हणे गोपाळ ॥ माझ्या गाईनें रक्षिलें द्विजकुळ ॥ क्षत्रियतृण एकवीस वेळ ॥ खाऊनि खुरटी पैं केली ॥५९॥
चौदा वर्षें गेली वना ॥ खोंचोनि मारिलें रावणा ॥ राज्यीं स्थापूनि बिभीषणा ॥ अयोध्येसि परतली ॥६०॥
ऐशा गाई पाचारुनि त्वरा ॥ अवघे आले निजमंदिरा ॥ नित्य काळ यमुनातीरा ॥ हरि ये गाई रक्षणार्थ ॥६१॥
गोकुळीं असतां जगज्जीवन ॥ दावी अद्‌भुत लीला करुन ॥ द्वादश गांवें गिळिला अग्न ॥ गोवर्धन उचलिला ॥६२॥
विश्वरुप मुखीं दाविलें ॥ पूर्णब्रह्म हें अवतरलें ॥ हें गोकुळींच्या जनां नाकळे ॥ दृढ व्यापिलें मायेनें ॥६३॥
एकदां आली शक्तिचतुर्दशी ॥ जन घरोघरीं पूजिती देवीसी ॥ विसरले हरिस्मरणासी ॥ सर्व शक्तींची जो ॥६४॥
जन कैसे जाहले मूढ ॥ शेंदुरें भरला देखती दगड ॥ तेथेंचि भजती दृढ ॥ नेणोनियां हरीतें ॥६५॥
जो त्रैलोक्यप्रकाशक वासरमणी ॥ त्यासी नमस्कार करी कोणी ॥ क्षुद्र दैवतें देखोनी ॥ नमस्कारिती साष्टांगें ॥६६॥
जाखाई जोखाई मायाराणी ॥ मारको मेसको यक्षिणी ॥ आग्या झोटिंग जखिणी ॥ त्यांसी भजोनी जन बुडाले ॥६७॥
कर्णपिशाच भगलिनी ॥ उच्छिष्टचांडाळी रानसटवी जखणी ॥ वेताळ मुंज्या काळरजनी ॥ भजिजे जनीं अतिप्रीतीं ॥६८॥
असो गोकुळींचे जन ॥ सांडूनियां विष्णुभजन ॥ घरोघरीं क्षुद्र देवांचें पूजन ॥ देखोनि हरि क्षोभला ॥६९॥
कोपतांचि कृष्णनाथ ॥ गोकुळींचे जन जाहले भ्रांत ॥ नरनारी प्राणी समस्त ॥ नग्न फिरती चोहटां ॥७०॥
यशोदा आणिक नंद ॥ दोघें असती सावध ॥ वरकड लोक विषयांध ॥ नग्न होवोनि धांवती ॥७१॥
सासू जांवई विहिणी ॥ कोण्ही न लाजती कोणा लागूनी ॥ तें नंदें दृष्टी देखोनी ॥ आश्वर्य करी तेधवां ॥७२॥
नंद म्हणे कृष्णनाथा ॥ यासी काय करावें आतां ॥ हरि म्हणे विष्णूस न भजतां ॥ गति तत्त्वतां ही जाहली ॥७३॥
करिताम विष्णूचें स्मरण ॥ अवघे होती सावधान ॥ नंद करि विष्णुचिंतन ॥ नारायणा पाव आतां ॥७४॥
सर्व लोकीं घेतां हरिनाम ॥ तत्काळ दूरी जाहला भ्रम ॥ नामापुढें क्रोधकाम ॥ वितळोनि जाती क्षणमात्रें ॥७५॥
असो नामाची अगाध करणी ॥ वेदव्यास बोलिला बहु पुराणीं ॥ हरिस्मरण करितां गोकुळजनीं ॥ स्वस्थ होइजे तेधवां ॥७६॥
यावरी मथुरेंत वृत्तांत ॥ वर्तला तो ऐका समस्त ॥ कंस बहुत चिंताक्रांत ॥ म्हणे काय करुं आतां ॥७७॥
ऐसा कोणी नाहीं बळी ॥ वैरी जाऊनि मारी गोकुळीं ॥ तों देवांतक आणि पितृदोही ते वेळी ॥ पैज बोलती कंसासी ॥७८॥
म्हणती आम्ही व्याघ्र होऊनि वनांत ॥ अहोरात्र बैसों जपत ॥ वना येतां राम कृष्णनाथ ॥ अकस्मात भक्षूं दोघांसी ॥७९॥
ऐकतांचि ऐसें वचन ॥ कंसें गौरविलें दोघेजण ॥ वस्त्रें भूषणें देऊन ॥ तत्काळचि बोळविले ॥८०॥
आयुष्य दोघांचें सरलें ॥ काळें बोलावूं पाठविलें ॥ व्याघ्र होवोनि बैसले ॥ जपत वृंदावनीं पैं ॥८१॥
तों ते दिवशीं राम आणि कृष्ण ॥ वना आले नाहींच दोघे जण ॥ वरकड गोप दुरुन ॥ व्याघ्र दोघे पाहती ॥८२॥
व्याघ्र विचारिती मानसी ॥ आतां आम्हीं जरी भक्षावें गोपांसी ॥ तरी उदयीक रामकृष्णांसी ॥ जन वनासी येऊं न देती ॥८३॥
यालागीं उगेचि राहिले ॥ गोपांनीं व्याघ्र दुरुनि देखिले ॥ गाई पिटिल्या ते वेळे ॥ पळत आले गोकुळा ॥८४॥
सांगती नंदादि गौळियांसी ॥ महाव्याघ्र आले वनासी ॥ गौळी भ्याले अति मानसीं ॥ म्हणती मुलांसी न धाडावें ॥८५॥
नंद सांगे यशोदे रोहिणी ॥ वना धाडूं नका चक्रपाणी ॥ दोघे व्याघ्र जपतीं वनीं ॥ गोप पळोनि आले आतां ॥८६॥
या वाडयाबाहेर देखा ॥ दोघांसी जाउं देऊं नका ॥ अवघा धंदा तुम्ही टाका ॥ परी जतन करा हरीसी ॥८७॥
आसनीं भोजनीं शयनीं ॥ विसंबूं नका चक्रपाणी ॥ जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं ॥ हरीलागूनि विसरुं नका ॥८८॥
गौळिणी रोहिणी यशोदा ॥ सदा रक्षिती रामगोविंदा ॥ कृष्ण मातेस म्हणे एकदां ॥ बाहेर जाऊं दे खेळावया ॥८९॥
मायेच्या गळां घातली मिठी ॥ धरी यशोदेची हनुवटी ॥ मायालाघवी जगजेठी ॥ कौतुकें बोले तेधवां ॥९०॥
माते राजबिदीस क्षणभरी ॥ दोघे खेळोनि येतों झडकरी ॥ माया म्हणे बहुत दूरी ॥ जाऊं नका सर्वथा ॥ ९१॥
दोन प्रहर जाहला दिन ॥ बिदीस आले दोघे जण ॥ साक्षात्‌ शेष नारायण ॥ गीर्वाणभाषा बोलती ॥९२॥
म्हणती आतांचि जाऊं वना ॥ वधावें त्या दोघां जणां ॥ चुकवोनि जनांच्या नयनां ॥ वृंदावना पातले ॥९३॥
शेष आणि अनंत ॥ एकामागें एक धांवत ॥ व्याघ्रांनीं दुरुनि देखिले येत ॥ महाधीट चपळ पैं ॥९४॥
दिधली भयानक आरोळी ॥ व्याघ्रवेषें दैत्य महाबळी ॥ वेगीं आले रामकृष्णांजवळी ॥ विक्राळ मुख पसरोनियां ॥९५॥
अष्टवर्षी बळिराम ॥ सप्तवर्षी मेघश्याम ॥ दाविला अद्‌भुत पराक्रम ॥ भक्तकामकल्पद्रुमें ॥९६॥
दोनी गदा मुखांतून काढूनी ॥ दोघीं घेतल्या तेचि क्षणीं ॥ निजांगें बळें भवंडूनी ॥ मस्तकीं ओपिल्या व्याघ्रांच्या ॥९७॥
तेणें मस्तकें जाहलीं चूर्ण ॥ दोघांचें गेले तेणें प्राण ॥ कृष्णें बळिरामें चर्में काढून ॥ चालिले घेऊन गोकुळा ॥९८॥
इकडे गोकुळीं यशोदा माता ॥ बिदोबिदीं पाहे कृष्णनाथा ॥ एक म्हणती वनासी देखिले जातां ॥ एकामागें एक पैं ॥९९॥
घाबरली तेव्हां माया ॥ नंद गौळी आले धांवोनियां ॥ चालिले वनासी पहावया ॥ रामकृष्णांसी तेधवां ॥१००॥
एकीं करीं घेतल्या डांगा ॥ एकीं भिंदिमाळा घेतल्या वेगां ॥ माया म्हणे बळिराम श्रीरंगा ॥ कोण्या वनीं पाहूं तुम्हां ॥१॥
धांवती गौळियांचे भार ॥ दोघे देखिले येतां समोर ॥ नंद पुढें धांवे सत्वर ॥ पुसे दोघांसी तेधवां ॥२॥
कोठें गेलां होतां दोघे जण ॥ व्याघ्रचर्में आणिलीं कोठून ॥ ते म्हणती दोघे व्याघ्र मरुन ॥ पडिले होते आपणचि ॥३॥
मग चर्में आम्हीं काढिलीं वेगीं ॥ ताता तुम्हांस आसनालागीं ॥ नंद म्हणे याचि दोघीं ॥ व्याघ्र मारिले असतील ॥४॥
घरास आणिले दोघे जण ॥ नंद म्हणे यशोदेलागून ॥ या दोघांसी रक्षण ॥ शक्राचेनि न करवे ॥५॥
हे दोघे जाहले अनिवार ॥ यांसी दुजा कोण रक्षिणार ॥ असो एके दिवशीं मुरहर ॥ कालिंदीतीरीं क्रीडत ॥६॥
तों कंसाचे रंगकार ॥ वस्त्रें रंगविती चित्रविचित्र ॥ गडियांसमवेत राजीवनेत्र ॥ तयांपासीं पातला ॥७॥
तों बळिभद्र पुसे तयांतें ॥ कोणाचीं वस्त्रें रंगवितां येथें ॥ ते म्हणती तुम्हाम गौळियांतें ॥ काय कारण पुसावया ॥८॥
तुम्ही गुराखे इतुके जण ॥ तुम्हां एकला मी करीन ताडण ॥ कंसासी कळतां वर्तमान ॥ गोकुळ तुमचें नुरेचि ॥९॥
ऐकोनि कोपला बळिभद्र ॥ ताडिले अवघे रंगकार ॥ मग ते पळती समग्र ॥ मथुरापुरीं पावले ॥११०॥
सांगती कंसासी वर्तमान ॥ वस्त्रें तुमचीं नेलीं हिरोन ॥ दचकलें कंसाचें मन ॥ न बोलवे वचन तयासी ॥११॥
इकडे यमुनातीरीं वनमाली ॥ वस्त्रे सकळांसी वांटिलीं ॥ गोवळे श्रृंगारिले सकळी ॥ सायंकाळीं परतले ॥१२॥
कृष्णें आणि बळिभद्रें ॥ घेतलीं नाहीं कदा वस्त्रें ॥ गोवळे हरीचीं चरित्रें ॥ गर्जत जाती आनंदें ॥१३॥
भ्याले गोकुळींचे लोक ॥ आलें म्हणती कंसाचें कटक ॥ भय वाहती सकळिक ॥ गौळी निघाले बाहेरी ॥१४॥
नंदें ओळखिले गोवळे ॥ वस्त्रें चित्रविचित्र पांघुरले ॥ तों रामकृष्ण पुढें आले ॥ नंदें पुसिलें तयांसी ॥१५॥
राजीवनेत्रा वनमाळी ॥ कोणाचीं वस्त्रें हिरोनि आणिलीं ॥ आणाल येथें एकादी कळी ॥ नांदणें गोकुळीं नव्हे मग ॥१६॥
कृष्ण म्हणे यमुनेथडीं ॥ खेळत होते आमुचे गडी ॥ आम्हांस देखोनि तांतडी ॥ भयें पळाले रंगकार ॥१७॥
वस्त्रें टाकूनि पळाले समस्त ॥ मग तीं आम्हीं आणिलीं त्वरित ॥ टाकूनि यावें अरण्यांत ॥ तरी तेंही तुम्हांस अन मानेचि ॥१८॥
असो आणिक एके दिवशीं ॥ शेषवतार आणि हृषीकेषी ॥ कंसाचिया पुष्पवाटिकेसी ॥ लवलाहेंसीं पातले ॥१९॥
तों तेथें कंसदूत ॥ पुष्पहारे भरुनि बहुत ॥ लवलाहें घेऊनि जात ॥ कंसरायाकारणें ॥१२०॥
तों बळिराम आणि नारायण ॥ आडवे धांवले दोघे जण ॥ दूतांसी केलें ताडण ॥ सुमने नेतां कोणासी ॥२१॥
ते म्हणती आम्ही कंसदूत ॥ प्रत्यही फुलें नेतों समस्त ॥ तुम्ही कोण वर्जावया येथ ॥ मग बोलत शेष पैं ॥२२॥
जाऊनि सांगा कंसातें ॥ बळिरामें पुष्पें नेलीं समस्तें ॥ ऐसें बोलोनि गोकुळपंथें ॥ पुष्पभार परतविले ॥२३॥
वेगें आले मंदिरा ॥ माता म्हणे भुवनसुंदरा ॥ कोणाचीं पुष्पें सुकुमारा ॥ हिरोनियां आणिलीं ॥२४॥
कृष्ण म्हणे ऐक जननी ॥ नाग पूजावे आजिचे दिनीं ॥ यालागीं तुज आणोनी ॥ पुष्पें दिधलीं जाण पां ॥२५॥
आजि उरग पूजावे पंचमीसी ॥ तेणें भोगींद्र संतोषे मानसीं ॥ हांसत मग हृषीकेशी ॥ संकर्षणा विलोकी ॥२६॥
असो कंसा जाणविती दूत ॥ पुष्पें हिरोनि नेलीं समस्त ॥ कंस भयभीत मनांत ॥ म्हणे वैरी बहुत वाढले ॥२७॥
वायुसंगें अग्नि वाढे ॥ कीं पळोपळीं सूर्य चढे ॥ तैसे वैरियांचे पवाडे ॥ अधिकाधिक चढताती ॥२८॥
तों उठिला जळासुर ॥ उभा राहिला कंसासमोर ॥ म्हणे तुझ्या शत्रूंचा संहार ॥ मी करीन निश्चयेंसीं ॥२९॥
यमुनार्‍हदामाजी जाऊनी ॥ मी सावध बैसेन लपोनी ॥ जळक्रीडेसी अनुदिनीं ॥ नित्य येतो शत्रु तुझा ॥१३०॥
तयासी तेथें धरुन ॥ सगळाचि मी गिळीन कृष्ण ॥ कंसास वाटलें समाधान ॥ म्हणे यशवंत होईं तूं ॥३१॥
वस्त्रें भूषणें गौरविला ॥ जळासुर उभा ठाकला ॥ मृत्यूनें बोलावूं पाठविला ॥ ओहटला आयुष्यपूर ॥३२॥
मित्रकन्यातीरीं सत्वर ॥ येऊनि लपला जळासुर ॥ केव्हां येईल नंदकिशोर ॥ म्हणोनियां जपतसे ॥३३॥
कीं पूर्वीं काळनेमी बैसला जपत ॥ केव्हां येईल म्हणे समीरसुत ॥ तैसा जळासुर वाट पाहात ॥ श्रीकृष्णाची सर्वदा ॥३४॥
आणिक वाटे नव जाय कोणाचे ॥ आगमन इच्छी श्रीकृष्णाचें ॥ धन्य भाग्य तयाचें ॥ ध्यान हरीचें लागलें ॥३५॥
द्वेषवैरें भजनस्थिती ॥ जे जगद्वंद्यास मनीं ध्याती ॥ त्यांसी नुपेक्षी जगत्पती ॥ वेध चित्तीं जयांच्या ॥३६॥
एकें केलें परिसाचें पूजन ॥ लोह लावितांचि करी सुवर्ण ॥ एकें परिस दगडावरी कुटून ॥ मग लोहासी लावियला ॥३७॥
तत्काळचि केलें सुवर्ण ॥ दोघां परी समसमान ॥ तैसाचि हा कालियामर्दन ॥ द्वेषियां भक्तां सारिखाचि ॥३८॥
असो एके दिवशीं घेऊनि गोपाळ ॥ जळक्रीडेसी आला घननीळ ॥ मग ते वेळीं गोप सकळ ॥ कालिंदीडोहीं प्रवेशती ॥३९॥
उडी टाकी रमानाथ ॥ खेळतां जळीं झाला गुप्त ॥ जळासुरासी शोधीत ॥ कोठें बैसला म्हणोनियां ॥१४०॥
पूर्वीं सागरीं शंखासुर ॥ वधोनि केला वेदोद्धार ॥ तैसाचि शोधी यादवेंद्र ॥ यमुनाडोहीं अरीतें ॥४१॥
देखोनियां श्यामसुंदर ॥ वेगें मिठी घाली जळासुर ॥ मल्लयुद्ध मांडिलें अनिवार ॥ न कळे बाहेर कोणातें ॥४२॥
श्रीहरीच्या बळापुढें ॥ मशक काय तें बापुडें ॥ ग्रीवेसी धरुनि निवाडें ॥ पिळिला तेव्हां असुर तो ॥४३॥
धुवोनि पिळिजे जेवीं वस्त्र ॥ तैसा रागें मुरडिला असुर ॥ भडभडां वाहे रक्तपूर ॥ यमुनानीर ताम्र झालें ॥४४॥
जळासुराचे प्राण ॥ गेले तेव्हां नलगतां क्षण ॥ इकडे गोपाळ जळक्रीडा करुन ॥ अवघे बाहेर निघाले ॥४५॥
गोपाळ चहूंकडे पाहती ॥ कोठें न दिसे सांवळी मूर्ती ॥ घाबरले परम चित्तीं ॥ परी यदुपति दिसेना ॥४६॥
हांक फोडिती तेधवां ॥ वैकुंठपति कमलाधवा ॥ काय झालासी केशवा ॥ जीवाच्या जीवा श्रीहरी ॥४७॥
हरि यमुनाडोहीं बुडाला ॥ एकचि हाहाकार झाला ॥ पुढती गोपाळ ते वेळां ॥ डोहामाजी प्रवेशले ॥४८॥
घेती डोहामाजी धांडोळा ॥ एक बडविती वक्षःस्थळा ॥ नेत्रीं वाहे अश्रुधारा सकळा ॥ दुःखकल्लोळ लोटती ॥४९॥
इकडे काय केलें हृषीकेशें ॥ जळासुराचें प्रेत नागपाशें ॥ बांधोनियां परमपुरुषें ॥ ओढोनि बाहेरी काढिलें ॥१५०॥
गोपांनीं देखिला गोविंद ॥ जो जगद्वंद्य मूळकंद ॥ जाहला गोपाळांसी ब्रह्मानंद ॥ मग धांवती भेटावया ॥५१॥
जैं जळासुराचें प्रेत ॥ बाहेर काढिलें अद्‌भुत ॥ अवघ्यांसी श्रीकृष्ण म्हणत ॥ ओढा समस्त निजबळें ॥५२॥
गोपांसी म्हणती रामयदुवीर ॥ आम्हीं वधिला जळासुर ॥ गोकुळीं हा समाचार ॥ सर्वथाही न सांगावा ॥५३॥
हें प्रेत आणा गोकुळीं ओढोन ॥ आम्हीं पुढें जातों दोघे जण ॥ कांखेसी घोंगडया घेऊन ॥ रामकृष्ण चालिले ॥५४॥
भोगींद्र आणि क्षीराब्धिजापती ॥ धांवत आले मंदिराप्रती ॥ यशोदेपुढें दोघे दडती ॥ जाहले चित्तीं भयभीत ॥५५॥
यशोदा म्हणे गाई टाकून ॥ पुढें कां आलेती दोघे जण ॥ यावरी राम मनमोहन ॥ काय वचन बोलती ॥५६॥
माते आज आमुच्या गडयांनीं ॥ बागुड काढिला यमुनेंतूनी ॥ आम्ही दोघांहीं देखिला नयनीं ॥ मग भिवोनी पळालों ॥५७॥
महाभ्यासुर देखिलें प्रेत ॥ आम्हांसी धीर न धरवेचि तेथ ॥ मग गाई टाकूनि त्वरित ॥ आलों धांवत तुजपासीं ॥५८॥
उरगेंद्र आणि यादवेंद्र ॥ दासांसी दाविती लीलाचरित्र ॥ मातेसी म्हणती सत्वर ॥ लपवीं आम्हां कोठेंतरी ॥५९॥
मातेनें ते वेळीं दोघे जण ॥ हृदयीं धरिले शेषनारायण ॥ म्हणती लेंकरें आलीं भिऊन ॥ सांडीं ओंवाळून सांडणें ॥१६०॥
ज्याची इंद्र आज्ञा वंदी मुकुटीं ॥ ज्यासी हृदयीं ध्याती पद्मजधूर्जटी ॥ त्यावरोनि यशोदा उतरी दृष्टी ॥ निंबलोण प्रीतीनें ॥६१॥
इकडे जळासुराचें प्रेत ॥ गोवळे ओढून आणीत ॥ एक त्याच्या मुखांत धूळ टाकीत ॥ एक मारिती पाषाण ॥६२॥
एक डांगा उचलोनि घालिती ॥ एक त्याचें शिरीं मुतती ॥ एक तोंडास काळें माखिती ॥ कोल्हाळ करिती भोंवते ॥६३॥
नंदादि गोकुळींचे जन ॥ आले नगराबाहेर धांवोन ॥ तों विशाळ प्रेत देखोन ॥ भयभीत सर्वही ॥६४॥
गोप सांगती ते वेळां ॥ आम्ही समस्तीं हा मारिला ॥ तुम्हांसी दावावया आणिला ॥ हरि पळाला भिवोनि ॥६५॥
आम्ही गोपाळ मोठे धीट ॥ म्हणोनि ओढीत आणिला नेटें ॥ नंदास आश्चर्य वाटे ॥ म्हणे अद्‌भुत वर्तलें कीं ॥६६॥
कंसासी समाचार कळला ॥ जळासुर प्राणासी मुकला ॥ हृदयीं परम दचकला ॥ म्हणे मृत्यु आला जवळी पैं ॥६७॥
दूत गोकुला पाठविले ॥ गोपांनीं जळमनुष्य मारिलें॥ तें घेवोनि या वहिलें ॥ शकटावरी घालोनियां ॥६८॥
दूत धांवोनि आले गोकुळा ॥ नंदास म्हणती उठा चला ॥ जळमनुष्य ये वेळां ॥ आणूं पाठविलें कंसानें ॥६९॥
गाडयावरी प्रेत नेलें घालोनी ॥ कंसें देखिलें तें नयनीं ॥ परम तळमळी मनीं ॥ म्हणे ईश्वरकरणी अद्‌भुत ॥१७०॥
ज्याच्या भयें पळती सुर ॥ महापराक्रमी जळासुर ॥ गुराख्यांनीं तो महावीर ॥ क्षणमात्रें मारिला ॥७१॥
पावकासी पतंगें धरिलें ॥ अळीनें गरुडासी उचलिलें ॥ जंबुकांनीं फोडिलें ॥ केसरीचें उदर जैसें ॥७२॥
अजांनीं मारिला व्याघ्र ॥ दर्दुरें रगडिअल उरगेंद्र ॥ विपरीत काळाची मोहर ॥ महाअसुर गेला हा ॥७३॥
जळासुराचें प्रेत पुरिलें ॥ नंद गौळी गोकुळा आले ॥ आनंदें उत्साह करुं लागले ॥ पूर्ण अवतरलें परब्रह्म ॥७४॥
उतरावया पृथ्वीचा भार॥ असुरपृतना अनिवार ॥ त्यांचा करावया संहार ॥ यादवेंद्र अवतरला ॥७५॥
असो मथुरेमाजी कंस ॥ चिंतानळ जाळी तयास ॥ अरिप्रताप विशेष ॥ अनिवार वाढला ॥७६॥
तों पुढें असुरासुर ॥ विक्राळवदन भयंकर ॥ महादुरात्मा जोडोनि कर ॥ कंसापुढें बोलतसे ॥७७॥
म्हणे क्षण न लागतां ये अवसरीं ॥ वधूनि येईन तुझा वैरी ॥ राया तूं सर्वथा चिंता न करीं ॥ जितचि वैरी आणीन ॥७८॥
अथवा तेथेंचि मारीन ॥ कीं सगळेचि दोघां गिळीन ॥ मग मथुरेसी तुझें कल्याण ॥ नांदें अढळ सर्वदा॥७९॥
कंस म्हणे तुझे बोल ॥ लागती अमृताहूनि रसाळ ॥ परी वैरी अनिवार सबळ ॥ नाटोपती कवणातें ॥१८०॥
जे जे जाती प्रतिज्ञा करुनी ॥ ते नाहीं देखिले पुन्हां नयनीं ॥ यालागीं तुझ्या वचनीं ॥ विश्वास माजा न बैसे ॥८१॥
मग तो म्हणे कंसातें ॥ माझा मृत्यु वायुसुताहातें ॥ त्यावांचोनि आणिकांतें ॥ नाटोपेंचि जाण पां ॥८२॥
रामअवतार संपला ॥ तेव्हांचि हनुमंत गुप्त जाहला ॥ कोणे कपाटीं जाऊनि बैसला ॥ नाहीं देखिला पुढती पैं ॥८३॥
तो असे स्वर्गीं कीं पाताळीं ॥ तो कासया येईल ये स्थळीं ॥ आज्ञा द्यावी ये वेळीं ॥ मज गोकुळीं जावया ॥८४॥
कंस संतोषला देखा ॥ म्हणे तूं माझा प्राणसखा ॥ भयकाळींचा पाठिराखा ॥ तुजपरता न देखों ॥८५॥
दिधलीं वस्त्रें अलंकार ॥ विजयी होऊनि ये सत्वर ॥ तैसाचि वायुवेगें असुर ॥ मित्रजातीरीं पातला ॥८६॥
तों तेथें मिळाले गोपाळ ॥ मध्यें बैसला वैकुंठ पाळ ॥ ज्याचें स्वरुप अगाध अचळ ॥ वेदशास्त्रांसी न वर्णवे ॥८७॥
तो असुरासुर दुरुनी॥ गोप येतां देखती नयनीं ॥ छत्तीस गांवें भूमीपासूनी ॥ शरीर गगनीं उंच दिसे ॥८८॥
भाळीं चर्चिला शेंदूर ॥ विक्राळ वदन भयंकर ॥ जिव्हा लळलळीत भ्यासुर ॥ दाढा बाहेर दिसताती ॥८९॥
गोपाळ जाहले भयभीत ॥ नन्दात्मजासि म्हणती समस्त ॥ हरि पहा हा दैत्य अद्‌भुत ॥ मुख पसरोनि येतसे ॥१९०॥
एक रिघती हरीचे षाठीं ॥ कैवारिया जगजेठी ॥ भयत्राता तुजविण सृष्टीं ॥ कोणी नाहीं दुसरा ॥९१॥
हरि म्हणे सकळांसी ॥ कांहीं भिऊं नका मानसीं ॥ मग तो वैकुंठपुरविलासी ॥ काय करिता जाहला ॥९२॥
मनीं विचारी जगन्नाथ ॥ यासी तों हनुमंताहातें मृत्य ॥ तो जरी सखा पावे येथ ॥ तरीचि दैत्य आवरे ॥९३॥
मग नेत्र झांकोनि भगवान ॥ करी वायुसुताचें चिंतन ॥ म्हणे प्राणसखया वेगेंकरुन धांवे आतां ये वेळे ॥९४॥
तूं भक्तांमाजी चूडामणी ॥ सद्‌गुणरत्‍नांची खाणी ॥ रात्रीमाजी द्रोणाचल आणूनी ॥ सवेंचि नेऊनि ठेविला ॥९५॥
अशोकवनारि सीताशोकहरणा ॥ राक्षसांतका संकटनाशना ॥ शक्रारिजनकदर्पहरणा ॥ अंजनीहृदयरत्‍ना हनुमंता ॥९६॥
सेतुबंधनीं हनुमंत ॥ बैसलासे समाधिस्थ ॥ तों कानीं शब्द अकस्मात ॥ आपुले स्वामीचा ऐकिला ॥९७॥
हृदय सद्गदित जाहलें ॥ म्हणे श्रीरामें मज कां आठविलें ॥ म्हणोनि तैसेंचि उड्डाण केलें ॥ क्षणमात्र न लागतां ॥९८॥
इकडे गाई गोपाळ लपवून ॥ श्रीकृष्ण जाहला रघुनंदन ॥ बळिराम जाहला लक्ष्मण ॥ करीं चाप बाण शोभती ॥९९॥
तों गगनपंथें हनुमंत आला ॥ सप्रेम नमस्कार घातला ॥ श्रीरामचरणीं मस्तक ठेविला ॥ तो आनंद वर्णिला नव जाय ॥२००॥
उचलोनियां रघुनाथें ॥ हृदयीं धरिलें हनुमंतातें ॥ म्हणे सखया तुजपरतें ॥ प्रिय मज असेना ॥१॥
हनुमंत म्हणे रघुपती ॥ कांहीं आज्ञा करा मजप्रती ॥ म्हणोनि बध्दांजली मारुती ॥ सीता पतीपुढें उभा असे ॥२॥
श्रीराम म्हणे ते अवसरीं ॥ पैल असुर येतो आम्हांवरी ॥ त्याचा मृत्यु असे तुझे करी ॥ तरीं संहारीं तूं तयातें ॥३॥
ऐकतांचि ऐसें वचन ॥ बलार्णव परम वायुनंदन ॥ वारण देखोनि धांवे पंचानन ॥ तैसा उडोनि चालिला ॥४॥
कीं द्विजेंद्र धांवे उरगावरी ॥ कीं सपक्ष नग देखोनि वृत्रारी ॥ तैसा हनुमंत ते अवसरीं ॥ असुरासुरें देखिला ॥५॥
म्हणे हा माझा काळमृत्यु ॥ कोठोनि आला अकस्मातु ॥ आतां पुरला माझा अंतु ॥ न वांचें मी यापुढें ॥६॥
कृतांतकिंकाळीसम थोर ॥ ऐसी हांक फोडी असुरासुर ॥ ऐसें देखोनि वायुकुमर ॥ परमावेशें धांविन्न्नला ॥७॥
काळ उभाचि कांपे चळचळी ॥ हनुमंतें ऐसी दिधली आरोळी ॥ हस्तींचा शूळ ते वेळीं ॥ भिरकाविला असुरें हो ॥८॥
हनुमंतें शूळ देखिला ॥ वरचेवरी मग झेलिला ॥ वायुसुतें भोवंडूनि ते वेळां ॥ सवेंचि घातला त्यावरी ॥९॥
हृदयावरी आदळला ॥ मूर्च्छागत असुर जाहला ॥ सवेंचि सरसावून धांविन्नला ॥ उचलिला पर्वत ॥२१०॥
बळें भोवंडूनि ते वेळां ॥ सीताशोकहरणावरी टाकिला ॥ येतां राघवप्रियें देखिला ॥ मग फोडिला मुष्टिघातें ॥११॥
सवेंचि वायुसुतें धांवोनी ॥ असुरासुर धरिला चरणीं ॥ गरगरां भोवंडोनि गगनीं ॥ मग धरणीवरी आपटिला ॥१२॥
जैसें भंगे मृत्तिकापात्र ॥ तैसें चूर्ण झालें शरीर ॥ परतोनि आला वायुकुमर ॥ मित्रकुळभूषणाजवळी पैं ॥१३॥
घातला साष्टांग नमस्कार ॥ उभा ठाकला जोडोनि कर ॥ प्रेमें सद्गद जाहलें अंतर ॥ नेत्रीं नीर वाहतसे ॥१४॥
आदिपुरुषा आत्मारामा ॥ मृडानीवरहृदयमंगलधामा ॥ अहल्योद्धारका मेघश्यामा ॥ पूर्णब्रह्मा अव्यक्ता ॥१५॥
ताटिकांतका क्रतुरक्षका ॥ कमलिनीमित्रकुलदीपक ॥ भार्गवचापभंजना सुखदायका ॥ भार्गवजिता रघुपते ॥१६॥
पुढती स्वामीचें आगमन ॥ व्हावया येथें काय कारण ॥ मंदस्मित रघुनंदन ॥ काय वचन बोलिला ॥१७॥
बा रे हा कृष्णावतार ॥ तुजलागीं झालों रघुवीर ॥ लक्ष्मण हा शेष साचार ॥ तोचि बळिभद्र जाहलासे ॥१८॥
रामलक्ष्मणांचे चरण ॥ वंदूनि भेटला वायुनंदन ॥ म्हणे धन्य मी पुन्हां दर्शन ॥ जाहलें मज स्वामीचें ॥१९॥
हनुमंत पुढती करी नमन ॥ म्हणे एक इच्छी माझें मन ॥ गोपाळरुप संपूर्ण ॥ मी पाहीन कैसें तें ॥२२०॥
ऐकोनि हांसे अयोध्याधीश ॥ म्हणे आतां पाहें गोपाळवेष ॥ ऐसें बोलोनि परमपुरुष ॥ श्रीकृष्णरुप दाविलें ॥२१॥
काखेसी घोंगडी हातीं काठी ॥ पांवा वाजवी जगजेठी ॥ गुंजमाळा रुळती कंठीं ॥ भोंवतीं दाटी गोपाळांची ॥२२॥
लक्ष्मण जाहला बळिभद्र ॥ भोंवते चरती गोभार ॥ हमामा हुमली नाना प्रकार ॥ खेळ खेळती गोवळे ॥२३॥
कृष्णापुढें नाचती गोवळे ॥ झोंबिया घेती एक बळें ॥ ऐसें हनुमंतें देखोनि ते वेळे ॥ गदगदोनि हांसिन्नला ॥२४॥
म्हणे वैकुंठपालका सर्वेशा ॥ अगाध लीला तुझी परमपुरुषा ॥ नाना अवतारलीला परेशा ॥ भक्तांलागीं दाविसी ॥२५॥
नमस्कारोनि जगज्जीवना ॥ समीरात्मज गेला निजस्थाना ॥ गोपाळ म्हणती नंदनंदना ॥ अकळ कळेना लीला तुझी ॥२६॥
एकाएकीं हनुमंत ॥ गगनपंथे आला अकस्मात ॥ करुनि असुराचा घात ॥ प्रताप अद्‌भुत दाविला ॥२७॥
दिनमणि पावला अस्त ॥ गोकुळांत परतला रमानाथ ॥ गोप नंदासी सांगती मात ॥ वनीं हनुमंत आला होता ॥२८॥
संहारुनि असुरासुरा ॥ परतोनि गेला दक्षिणसागरा ॥ ऐसें ऐकतां त्या अवसरा ॥ आश्वर्य वाटलें गौळियां ॥२९॥
हरिविजयग्रंथ सतेज ॥ हाचि केवळ दिव्य रसराज ॥ भवरोगिया सेवितां आरोग्य सहज ॥ तेजःपुंज स्वयें होये ॥२३०॥
शुकवैद्यें आत्महस्तेंकरुन ॥ उतरिलें हें दिव्य रसायन ॥ परीक्षितीनें सेविलें सप्तदिन ॥ आरोग्य जाण तो झाला ॥३१॥
हे सेविता रसायन ॥ ब्रह्मांडभरी होइजे पावन ॥ परद्रव्यपरनिंदाग्रहण ॥ हें वावडें न सेविजे ॥३२॥
ऐसा रसराज हरिविजय ॥ सेवितां सर्वकाळ पावे जय ॥ भवरोगिया आणिक उपाय ॥ नाहीं नाहीं दूसरा ॥३३॥
जन्ममरणमोचक वैद्यराज ॥ तो ब्रह्मानंदस्वामी सहज ॥ श्रीधर तयाचे चरणरज ॥ सेवितां आरोग्य सर्वदा ॥३४॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ संतजन पंडित परिसोत ॥ त्रयोदशाध्याय गोड हा ॥२३५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥अध्याय॥१३॥ओंव्या॥२३५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel